
ओयो हॉटेल (OYO Hotel) हे जोडप्यांसाठी सुरक्षित नसल्याचा आरोप नेहमीच केला जातो. आता याचीच प्रचीती येणारे एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. ओयो हॉटेल्समध्ये छुप्या कॅमेऱ्यातून जोडप्यांचे व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल करणाऱ्या टोळीला पोलिसांनी पकडले आहे. हे लोक 'ओयो' हॉटेलमध्ये वेगवेगळे छुपे कॅमेरे लावायचे त्यानंतर हॉटेलमध्ये थांबलेल्या जोडप्याच्या संपूर्ण हालचाली रेकॉर्ड करायचे व त्यानंतर त्यांना ब्लॅकमेल करून पैशांची मागणी करायचे.
यासाठी विरोध केल्यास व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देण्यात येत असे. पोलिसांना आरोपींकडे अनेक अश्लील व्हिडिओ सापडले आहेत. एडीसीपी साद मिया खान यांनी सांगितले की, विष्णू सिंग रा. गढी चौखंडी, अब्दुल वहाव रा. खोंडा अशा दोन मुख्य आरोपींना अटक करण्यात आली आहे. या दोघांनी नुकतेच 'ओयो' हॉटेलमधील एका जोडप्याला त्यांचे अश्लील व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल केले होते.
एडीसीपीच्या म्हणण्यानुसार, विष्णू आणि वहाव दोघेही काही दिवसांपूर्वी फेज-3 येथील ओयो हॉटेलमध्ये थांबले होते. तेथे त्यांनी होल्डर कॅमेरे लावले व ते निघून गेले. काही दिवसांनी एक जोडपे तिथे आले. या दोघांनी त्या जोडप्याचा व्हिडिओ बनवला व त्यानंतर दोघांना फोन करून ब्लॅकमेल करून पैशांची मागणी करण्यास सुरुवात केली. इतकेच नाहीतर पैसे न दिल्यास व्हिडिओ व्हायरल करण्याची व जीवे मारण्याची धमकीही दिली.
त्यांचा तिसरा साथीदार नोएडा येथील पंकज कुमार यालाही पकडण्यात आले आहे. पंकज हा बँक खाते उघडण्याचे, सिम अॅक्टिव्हेट करून देण्याचा व्यवसाय करायचा. तो अवैध धंद्यात गुंतलेल्या लोकांना मदत करत असे. याशिवाय त्यांचा चौथा साथीदार विजय नगर गाझियाबाद येथील रहिवासी अनुराग कुमार हा अनधिकृत कॉल सेंटर चालवत असे. तो आपली दुबईतील कंपनी असल्याचे भासवून OLX वरून स्वस्त दरात आयफोन विकायचा. (हेही वाचा: Crime: आयटी कंपनीत काम करणाऱ्या 26 वर्षीय महिलेवर सामुहिक बलात्कार)
पंकज आणि सौरभ यांनी नुकतेच अनुरागला अनधिकृत कॉल सेंटर चालवण्यासाठी सिम आणि खाते दिले होते. त्याद्वारे अनुरागने ओएलएक्सवर आयफोनची जाहिरात देऊन कमी किमतीत विक्री करण्याचे आमिष दाखवून ग्राहकांची फसवणूक केली. अनुराग आठ बनावट कॉल सेंटर चालवत होता. दोन वर्षांपासून या कामात गुंतून आतापर्यंत सुमारे कोटय़वधी रुपयांची फसवणूक केली आहे. बनावट कॉल सेंटर चालविणाऱ्या अनुरागकडून पोलिसांना 11 लॅपटॉप, 7 सीपीयू, 21 मोबाईल, विविध बँकांचे 22 एटीएम कार्ड, एक पॅन कार्ड, एक आधार कार्ड, एकूण 49 ओळखपत्र, सिमकार्ड-26 मिळाले आहे.