Representational Image (Photo Credits: File Photo)

गुजरात (Gujarat) येथे बारावी परीक्षेदरम्यान घडलेला एक अजब प्रकार समोर आला आहे. गुजरात माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण बोर्डाद्वारे (GSHSEB) आयोजित करण्यात आलेल्या बारावी परीक्षेदरम्यान तब्बल 959 विद्यार्थ्यांनी सामूहिक कॉपी केल्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला असून यात विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या प्रश्नाचे फक्त उत्तरच समान नाही तर चुकाही सारख्याच आहेत. आतापर्यंत बोर्डाच्या इतिहासातील सामूहिक कॉपीची ही सर्वात मोठी घटना आहे. परीक्षेत कॉपी होऊ नये म्हणून बोर्डाने काटेकोर बंदोबस्त केला होता. तरी देखील हा प्रकार घडल्याने सर्वजण थक्क झाले आहेत.

सामूहिक कॉपी करणाऱ्या तब्बल 959 विद्यार्थ्यांचा निकाल बोर्डाने अडवला आहे. त्याबरोबर त्या विद्यार्थ्यांना संबंधित विषयात नापास करण्यात आले आहे. (कॉपी बहाद्दरांसाठी यंदा MSBSHE चा नवा कडक नियम!)

अनेक तक्रारींवर कारवाई करताना बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी परीक्षा केंद्रावरील उत्तर प्रत्रिकांची बारकाईने तपासणी केल्याानंतर हा सामूहिक कॉपीचा प्रकार समोर आला. यातील सर्व परीक्षा केंद्रे ही जूनागड आणि गिर-सोमनाथ जिल्ह्यातील आहेत. बोर्डाच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 959 विद्यार्थ्यांनी एकाच क्रमाने एका प्रश्नासाठी सारखेच उत्तर लिहिले आहे. त्याचबरोबर उत्तरात झालेल्या चुका देखील सारख्याच आहेत. (कॉपीचे प्रकार टाळण्यासाठी भरारी पथकांची नेमणूक)

परीक्षा केंद्रावरील शिक्षकांनीच एकसारखे उत्तर लिहायला सांगितल्याची माहिती काही विद्यार्थ्यांनी चौकशी समितीला दिली आहे. अकाऊंटिंग, अर्थशास्त्र. इंग्रजी साहित्य आणि सांख्यिकी या विषयात सामूहिक कॉपी झाल्याचे आढळून आले. या धक्कादायक प्रकारानंतर बोर्डाने सामूहिक कॉपीचा प्रकार घडलेले सर्व परीक्षा केंद्रे रद्द करण्याची योजना केली आहे.