Maharashtra SSC Exam 2019 start from, March 1, 2019: इयत्ता दहावीच्या विद्यार्थी आणि पालकांसाठीसुद्धा उद्यापासून पुढचे काही दिवस महत्त्वाचे असणार आहेत. उद्यापासून (1 मार्च) इयत्ता दहावी बोर्ड परीक्षा सुरु होत आहे. ही परीक्षा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतली जाते. पुणे,नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत ही परीक्षा सालाबादप्रमाणेच घेतली जाईल. जे विद्यार्थी जुन्या अभ्यासक्रमानुसार परीक्षेला बसले आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा म्हणजे शेवटची संधी ठरणार आहे. तर, नव्या अभ्यासक्रमानुसार परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची या अभ्यासक्रमानुसार घेतली जाणारी ही पहिलीच परीक्षा आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने ठरवून दिलेले नियम आणि निकषांनुसार ही परीक्षा वेळेत सुरु होईल आणि वेळे पार पडेल. राज्य मंडळ अध्यक्षा डॉ. शकुंतला काळे यांनी प्रसारमाध्यमांना माहिती देताना सांगितले की, निष्पक्ष आणि कोणत्याही गैरप्रकाराशिवाय ही परीक्षा योग्य पद्धतीने पार पडण्यासाठी मंडळाने आवश्यक ती सर्व तयारी पूर्ण केली आहे. कॉपीसारखे गैरप्रकार टाळण्यासाठी शिक्षण मंडळाची भरारी पथके परीक्षा केंद्रांवर नजर ठेऊन असतील. परीक्षेची सुरुवात मराठी विषयापासून सुरु होईल. सकाळी (शुक्रवार, 1 मार्च) आकरा वाजता ठरलेल्या वेळेनुसार परीक्षा सुरु होईल. (हेही वाचा, BEST देणार HSC च्या विद्यार्थ्यांना परीक्षा काळात मोफत प्रवास करण्याची मुभा)
इयत्ता दहावी परीक्षा 2019 एकूण तपशील | |
राज्यभरातील एकूण परिक्षा केंद्र | ४ हजार ८७४ |
एकूण परीक्षार्थी (जुन्या आणि नव्या अभ्यासक्रमानुसार) | १७ लाख ८१३ |
परीक्षेला विद्यार्थी पाठविणाऱ्या एकूण शाळा | २२ हजार २४४ |
परीक्षार्थी एकूण विद्यार्थी संख्या | ९ लाख २७ हजार ८२२ |
परीक्षार्थी एकूण विद्यार्थिनी संख्या | त्यात ७ लाख ७२ हजार ८४२ |
दिव्यांग विद्यार्थी संख्या | ८ हजार ८३० |
दरम्यान, दरम्यान, सर्व परीक्षार्थींना परीक्षा हॉलमध्ये परीक्षा सुरु होण्यापूर्वी आर्धा तास आगोदर उपस्थित राहणे आवश्यक आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी परीक्षार्थींच्या संख्येत काहीशी घट झाली आहे गेल्या वर्षी या परीक्षेसाठी १७ लाख ५१ हजार ३५३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. मात्र, यंदाच्या वर्षी या परीक्षेसाठी नोंदीणी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रामण ५० हजार ५४० ने घटले आहे.