काँग्रेसवर नाराज असलेले गुजरातमधील पाटीदार नेते हार्दिक पटेल (Hardik Patel) यांची नाराजी लवकरच दूर होणार अशी चर्चा आहे. काँग्रेस पक्षाचे एक चिंतन शिबीर लवकरच पार पडत आहे. या शिबीरापूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress Leader Rahul Gandhi) हे दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात हार्दिक पटेल राहुल यांची भेट घेणार असल्याचे समजते. आगामी गुजरात विधानसभा निवडणूक 2022 (Gujarat Assembly Election 2022)च्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या गोटात जोरदार हालचाली सुरु आहेत.
हार्दिक पटेल हे गुजरातमधील एक ताकदवान पाटीदार नेते आहेत. सध्या ते काँग्रेसचे गुजरात कार्यकारी अध्यक्षही आहेत. पाठिमागील काही दिवसांपासून पक्षावर ते नाराज आहेत. त्यामुळे त्यांनी सातत्याने काँग्रेस पक्षाबद्दल आपली नाराजी बोलून दाखवली आहे. मध्यंतरी त्यांनी भाजपचे कौतुक करणारी विधानेही केली आहेत. भाजपमध्ये सर्वच गोष्टी वाईट नाहीत. काही गोष्टी जरुर चांगल्या आहेत. त्याचा आपण (काँग्रेस) स्वीकार करायला हवा, असेही हार्दिक यांनी म्हटले होते. इतकेच नव्हे तर त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन काँग्रेस आणि पक्षाचे चिन्ह हटवलेही होते.
हार्दिक पटेल यांनी 2019 मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्या वेळी हार्दिक केवळ 28 वर्षांचे होते. दरम्यान, पाठिमागील काही दिवसांपासून ते पक्षावर तीव्र नाराज आहेत. नवीन लग्न केलेल्या नवरदेवाची नसबंदी केल्याप्रमाणे माझी अवस्था काँग्रेसमध्ये झाल्याचेही त्यांनी म्हटले होते. (हेही वाचा, Hardik Patel: हार्दिक पटेल पुन्हा आक्रमक, काँग्रेस हायकमांडलाही अल्टीमेटम )
वृत्तसंस्था एएनआयने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्ता म्हटले आहे की, पटेल यांच्या नाराजीनंतर राहुल गांधी यांनी त्यांच्याशी संपर्क केला. त्यांना पक्षातच राहण्याचा आग्रह केला. सूत्रांनी म्हटले की, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुजरातमध्ये पार्टी प्रभारी आणि इतर अन्य नेत्यांमध्ये असलेले मतभेद सोडविण्यासाठी हार्दिक पटेल यांच्याशी संपर्क केला.