Hardik Patel | (Photo Credits: Facebook)

गुजरात विधानसभा निवडणुका (Gujarat Assembly Election 2022) तोंडावर आल्या असतानाही काँग्रेसची (Congress) चिंता संपताना दिसत नाही. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये सपाटून मार खाल्ल्यानंतर गुजरातमध्ये काँग्रेस यश संपादन करण्यासाठी प्रयत्न करत आहे. असे असतानाच काँग्रेसमधील युवा नेते हार्दिक पटेल (Hardik Patel) नाराज असल्याच्या बातम्या येत आहेत. हार्दिक पटेल आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवता दाखवता आता तर त्यांनी थेट पक्षनेतृत्वाला अल्टीमेटमच दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की, काही नेत्यांना वाटते आहे की, हार्दिक पटेलांनी काँग्रेस सोडावी. अद्यापही मी काँग्रेसमध्येच आहे. काँग्रेसमध्ये राहायचे आहे. पण आता माझे मनोबल कमी होऊ लागले आहे. त्यामुळे नेतृत्वाने काय तो निर्णय लवकर घ्यावा. हार्दिक पटेल यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपले म्हणने मांडले आहे. त्यांनी एका वृत्तपत्राला मुलाखतही दिली आहे. त्यांनी कोणाचेही नाव घेणे टाळले आहे.

हार्दिक पटेल यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, सध्यातही मी काँग्रेसमध्ये आहे. मला आशा आहे की, काँग्रेसचे काही नेते नक्की काहीतरी मार्ग काढतील. जेणेकरुन मी काँग्रेसमध्येच राहीन. इथे काही लोक असे आहेत ज्यांना वाटते की, हार्दिक पटेलने काँग्रेस सोडायला हवी. हे लोक मला खच्ची करण्याचा प्रयत्न करत आहेत. हार्दिक पटेल यांचे हे वक्तव्य तेव्हा आले आहे जेव्हा त्यांनी काँग्रेस सोडण्याचे वृत्त फेटळून लावले. (हेही वाचा, Hardik Patel WhatsApp Bio Change: हार्दिक पटेलचा 'भगवा' अवतार! व्हॉट्सअॅप बायोमधून काँग्रेस गायब)

ट्विट

गुजरात विधानसभा निवडणुका डिसेंबर 2022 मध्ये होऊ घातल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पटेल यांनी घेतलेली भूमिका काँग्रेससाठी चिंता वाढवणारी ठरु शकते. हार्दिक पटेल यांनी राम मंदिर उभारल्याबद्दल पाठीमागील काही दिवसांपूर्वीच भाजपचे कौतुक केले होते. गुजरातमध्ये भाजप भक्कम आहे. भाजपकडे काही गोष्टी नक्कीच चांगल्या आहेत. त्याचा काँग्रेसनेही अभ्यास करुन आत्मसात केल्या पाहिजेत असेही पटेल यांनी म्हटले होते. हार्दिक पटेल यांची पाठिमागील काही दिवसांपासून विधाने पाहता त्यांची काँग्रेसवरील नाराजी लपून राहिली नाही. काँग्रेसने वेळीच डॅमेज कंट्रोल केले नाही तर कदाचित हार्दिक पटेल काँग्रेसचा 'हात' सोडू शकतात, अशी चर्चा सध्या तरी राजकीय वर्तुळात सुरु आहे.