G20 | G20 Summit in New Delhi (Representational Image; Photo Credit: Twitter/ @ANI)

भारत यंदा जी-20 शिखर परिषदेचे (G-20 Summit) आयोजन करत आहे. या यजमानपदाद्वारे देश जी-20 देशांमधील जागतिक नेत्यांचे स्वागत करण्यासाठी पूर्णपणे सज्ज झाला आहे. महत्वाचे म्हणजे या जागतिक नेत्यांच्या यादीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांचाही समावेश आहे. राजधानी दिल्लीमध्ये शिखर परिषदेची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. या जागतिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जो बिडेन, ऋषी सुनक, जस्टिन ट्रूडो आणि इतरांसह 25 हून अधिक देशांचे नेते दिल्लीत येत आहेत. भारतातील अनेक बड्या उद्योगपतींनादेखील जी-20 कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी निमंत्रण पाठवण्यात आले आहे.

देशातील प्रमुख उद्योगपती शनिवारी रात्री म्हणजेच 9 सप्टेंबर रोजी भारत मंडपम येथे जी-20 देशांच्या नेत्यांसोबत डिनरला उपस्थित राहतील. बिझनेस टायकून मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्यासह देशातील सुमारे 500 बड्या उद्योगपतींना आमंत्रित करण्यात आले आहे. यामध्ये टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन, भारती एअरटेलचे अध्यक्ष सुनील भारती मित्तल, आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला आदींचा समावेश आहे.

परदेशी गुंतवणूक, सार्वजनिक-खाजगी भागीदारी मॉडेल (पीपीपी) आणि देशी-विदेशी कंपन्यांमधील करारांसह देशातील अर्थव्यवस्थेच्या सर्व बाबी लक्षात घेता या कार्यक्रमात व्यावसायिकांनी सहभागी होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जी-20 चा उद्देश या गटातील सर्व देशांमधील व्यावसायिक संबंधांना उंचीवर नेणे हा आहे. देशातील आघाडीचे उद्योगपती यातील एक प्रमुख दुवा आहेत. (हेही वाचा: G20 Summit: अमेरिकन राष्ट्राध्यक्ष Joe Biden च्या स्वागताला भारत सज्ज; वाळूशिल्पकार Sudarsan Pattnaik यांनी साकारलं खास वाळूशिल्प)

दरम्यान, यंदा जी-20 शिखर परिषद 9 ते 10 सप्टेंबर दरम्यान प्रगती मैदानावर नव्याने बांधलेल्या आंतरराष्ट्रीय संमेलन आणि प्रदर्शन केंद्र ‘भारत मंडपम’ येथे होणार आहे. या परिषदेत अनेक देशांचे राष्ट्रप्रमुख, युरोपियन युनियन आणि आमंत्रित अतिथी देशांचे उच्च अधिकारी सहभागी होण्याची शक्यता आहे. परिषदेत सहभागी होण्यासाठी आजपासून पाहुणे भारतात येण्यास सुरुवात झाली आहे.