Uttarakhand Forest Fire (Photo Credits: Twitter)

कोरोना व्हायरस (Coronavirus) सोबतच देश इतर अनेक समस्यांचा सामना करीत आहे. उत्तराखंड (Uttarakhand) मधील पौरी-गढवाल जिल्ह्यातील श्रीनगर भागात शनिवारी जंगलात मोठी आग (Forest Fire) लागली. कडक उष्णता आणि सूर्यप्रकाशामुळे उत्तराखंडच्या वनक्षेत्रात ही आग लागली. जोरदार वाऱ्यामुळे ही आग वेगाने पसरत आहे, सोबत तीव्र उन्हामुळे जंगलातील गवत आणि लाकूड कोरडे पडले आहे, ज्यामुळे आग खूप वेगाने पसरत आहे. स्थानिक वनाधिकारी अनिता कुंवर म्हणाले की, यामुळे 5 ते 6 हेक्टर जंगल बाधित झाले आहे. जोरदार वाऱ्यामुळे आगीवर नियंत्रण मिळू शकले नाही व आग विझविण्यासाठी अजूनही पथके पाचारण केली जात आहेत.

अवघ्या चार दिवसांत जंगलांमध्ये आगीच्या 23 घटना समोर आल्याने चिंता वाढली आहे. मागील वर्षांच्या तुलनेत जंगलांमध्ये आग पसरण्याचे प्रमाण अद्याप कमी असले तरी, हवामान बदलल्यामुळे व तापमानात वाढ झाल्याने आव्हान वाढले आहे. वर्षाच्या सुरूवातीपासून आतापर्यंत राज्याला जंगलामध्ये लागलेल्या 46 आगीच्या घटनांना सामोरे जावे लागले आहे, ज्यामुळे राज्यातील 71 हेक्टर क्षेत्रावरील जंगलावर परिणाम झाला आहे. अशा घटना वाढत राहिल्याने आता जंगलात राहणाऱ्या वन्यजीव प्राण्यांना धोका निर्माण झाला आहे.

राज्यातील एकट्या कुमाऊं भागात जंगलातील आगीच्या सुमारे 21 घटना घडल्या आहेत. गढवाल भागात जंगलात आग लागण्याच्या 16 घटना घडल्या असून, राखीव वनक्षेत्रात जंगलाला आग लागल्याच्या 9 घटना घडल्या आहेत. आगीमुळे वनविभागाला अंदाजे 1.32 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. जंगलात आग लागल्यामुळे दोन जणांनी जीवही गमावला आहे, तर एकजण जखमी झाल्याची माहिती आहे. (हेही वाचा: रेल्वेचा भोंगळ कारभार; 30 तासांच्या प्रवासासाठी मजुरांना घेऊन 4 दिवस फिरत राहिली श्रमिक स्पेशल ट्रेन, कामगार त्रस्त)

पीआयबीने याबाबत माहिती दिली आहे, त्यानुसार यंदा जंगलात आग लागण्याच्या घटनांमध्ये बऱ्यापैकी घट झाली आहे. या भागामध्ये मानवी हालचाली कमी झाल्यामुळे, तर काही प्रमाणात पावसामुळे आगीच्या घटना कमी झाल्या आहेत. दरम्यान, याआधी 2016 मध्ये 4,538.21 हेक्टर क्षेत्र जंगलाच्या आगीचे भ्यक्ष झाले होते. 2000 मध्ये उत्तराखंडची स्थापना झाल्यापासून 44,518 हेक्टर जंगल जळाले आहे.