कामगारांना (Migrant Workers) त्यांच्या गावी पोहोचवण्यासाठी सध्या देशात श्रमिक स्पेशल ट्रेन (Shramik Special Train) चालवली जात आहे. या गाड्यांमधून गेले कित्येक दिवस देशातील विविध भागात अडकलेले मजूर आपल्या घरी जात आहेत. मात्र यामध्ये अशा काही गाड्या आहेत, ज्यांच्यामुळे प्रवाशांचे हाल झाले आहेत. या गाड्यांमधून जाताना प्रवाशांना त्यांच्या गंतव्यस्थानी जाण्यासाठी बरीच प्रतीक्षा करावी लागली आहे, कारण श्रमीक रेल्वे 30 तासांच्या प्रवासासाठी 4 दिवस लावत आहेत. अशा परिस्थितीत कामगार भूक, तहान आणि उकाडा यामुळे त्रस्त आहेत. दिल्लीहून बिहारमधील मोतिहारीकडे जाणाऱ्या ट्रेनला समस्तीपूर येथे पोहचण्यासाठी चार दिवस लागले आहेत. आज तकने याबाबत वृत्त दिले आहे.
प्रवाशांना मोतीहारीचे तिकीट दिले आहे व हा प्रवास 30 तासांचा आहे, अशा परिस्थितीमध्ये तब्बल 4 दिवस ही ट्रेन प्रवाशांना घेऊन नुसतीच फिरत राहिली. चार दिवसांनी समस्तीपूरला ही ट्रेन पोहोचल्यावर, एका महिलेला ट्रेनमध्येच प्रसूतकळा सुरु झाल्या, तेव्हा तिला ट्रेनमधून उतरवले गेले. या महिलेने कोणत्याही वैद्यकीय सुविधेशिवाय प्लॅटफॉर्मवर मुलीला जन्म दिला. ही गोष्ट समजताच रेल्वेचे वरिष्ठ डीसीएम यांनी त्यांच्या कारने या महिलेला दवाखान्यात पोहोचले. (हेही वाचा: परप्रांतीय मजूरांना घरी सोडवण्यासाठी आतापर्यंत 3274 श्रमिक रेल्वे गाड्या धावल्या; 44 लाख मजूर घरी परतले)
समस्तीपूरला पोहोचणार्या इतर गाड्यांच्या प्रवासाचीही हीच तऱ्हा आहे. अशा गाड्यांमध्ये कोणी 22 मे पासून प्रवास करत होता, तर कुणी तहानलेले-भुकेला होता. समस्तीपुरला पोहोचलेला रेल्वेचा प्रवासी गगन सांगतो की, त्याने 22 मे रोजी पुण्यात रेल्वे पकडली आणि 25 मे रोजी दुपारी ही गाडी समस्तीपुरला पोहोचली. छत्तीसगड, ओडिशा, झारखंड, पश्चिम बंगालचा दौरा करत ही गाडी पोहचली होती. यावर रेल्वे प्रशासनाचे म्हणणे आहे की, ट्रॅक न मिळाल्यामुळे रेल्वेचे मार्ग वळवावे लागले. या दरम्यान कामगारांना अन्न व पाणी मिळावे यासाठी प्रयत्न केले जात आहेत.