केंद्रीय गृह खात्याने भारतामध्ये कोरोना व्हायरस लॉकडाऊन 4 ची घोषणा करताना काही गोष्टींमध्ये सवलती दिल्या आहेत. आतापर्यंत लॉकडाऊनमध्ये ई कॉमर्स साईट्सवरून केवळ अत्यावश्यक वस्तूंची ऑर्डर घेतली जात होती आणि त्यांचा घरपोच पुरवठा केला जात होता. मात्र केंद्र सरकारच्या नव्या आदेशानुसार ई कॉमर्स साईट्सना केवळ कंटेन्मेंट झोन वगळता इतर रेड, ऑरेंज, ग्रीन झोनमध्ये अत्यावश्यक गोष्टींसोबतच इतर वस्तू देखील पोहचवता येणार आहेत. पूर्वीच्या नियमावलीनुसार, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक वस्तू, मोबाईल फोन केवळ ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये घरपोच मिळत होते. मात्र आता नियमावलीमध्ये बदल करत ग्राहकांसह ई रिटेलर्सना देखील मोठा दिलासा देण्यात आला आहे.
31 मे पर्यंत वाढवण्यात आलेल्या कोरोना व्हायरस लॉकडाऊनमध्ये भारताच्या रूतलेल्या अर्थचक्राला चालना देण्यासाठी काही गोष्टींना सशर्त परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान आता Flipkart, Amazon India, Snapdeal, Pepperfry सारख्या लोकप्रिय ई कॉमर्स साईटवरून अनेक गोष्टींची होम डिलेव्हरी लोकांना मिळू शकतो. दिवसागणिक वाढणारा कोरोना व्हायरसचा वाढता धोका पाहता शक्य तितक्या वस्तू होम डिलेव्हरीच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहचवण्याचं सरकारचं आवाहन आहे. अनेक ठिकाणी नागरिकांचा याला प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान मागील दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ घरामध्ये अडकलेल्या नागरिकांना आता घरपोच सोयी- सुविधा मिळू शकणार आहे. दरम्यान ही केंद्र सरकारची नियमावली असून महाराष्ट्र राज्य कोणकोणत्या गोष्टींना मंजुरी देते हे पाहणं देखील उत्सुकतेचं आहे. Lockdown 4 Guidelines: केंद्र सरकारने जाहीर केले लॉक डाऊन 4 चे नियम; जाणून घ्या 31 मे पर्यंत Night Curfew सह कोणत्या गोष्टी सुरु असतील व काय असेल बंद, See Full List.
गेल्या 24 तासांता देशात 5242 कोरोना रुग्ण आढळले असून ही आतापर्यंतची सर्वाधिक वाढ झालेली रुग्णसंख्या आहे. यामुळे देशात कोरोना रुग्णांची एकूण संख्या 96,169 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत 157 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांची एकूण संख्या 3029 इतकी झाली आहे अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. महाराष्ट्र आणि मुंबईमध्ये सध्या कोरोनाबाधितांचा आकडा सर्वाधिक आहे.