Flight Ticket Prices: विमान प्रवास महागला; कच्च्या तेलांच्या किंमतींमुळे फ्लाईटचे दर भिडले गगनाला
Representational Image (Photo Credits: Pixabay, Lars_Nissen_Photoart)

कोरोनाचा काळ संपून सण-उत्सवाला सुरुवात झाल्यानंतर विमान कंपन्यांची (Airlines Companies) मनमानी पुन्हा एकदा सुरू झाली आहे. जयपूरहून उड्डाण करणाऱ्या जवळपास सर्वच विमान कंपन्यांची तिकिटे 40 टक्क्यांनी महागली आहेत. यासह देशांतर्गत हवाई भाडे अजून मोठ्या प्रमाणात वाढण्याची अपेक्षा आहे. जेट इंधनाच्या किमती वाढल्या असल्याने विमान तिकिटांमध्ये वाढ होत आहे. अलीकडे, बहुतेक देशांतर्गत मार्गांवर भाडे सुमारे 20-25 टक्क्यांनी वाढले आहे. विमान कंपन्यांनी त्यांच्या तिकिटांच्या किमती वाढवण्याची ही पहिलीच वेळ नाही.

दिवाळी, होळी आणि ईदच्या मुहूर्तावर विमान कंपन्या दरवेळी तिकीट दरात वाढ करतात. फक्त दाखवण्यासाठी विमान कंपन्या डीजीसीआयच्या अखत्यारीत आहे, परंतु जेव्हा कंपन्या अचानक तिकिटांचे दर वाढवतात तेव्हा त्यांची मनमानी कोणीही थांबवत नाही. विमानभाड्यात वाढ होऊनही येणाऱ्या उन्हाळी हंगामासाठी प्रवासाची मागणी जोर धरत आहे. मार्चमध्ये गोवा, पोर्ट ब्लेअर, अमृतसर, वाराणसी, श्रीनगर आणि अंदमान आणि निकोबार सारख्या लोकप्रिय ठिकाणांना भेट देण्यासाठीच्या क्वेरींमध्ये सरासरी 35-40 टक्के वाढ झाली आहे.

होळीच्या मुहूर्तावर विमान कंपन्यांनी तिकिटांच्या दरात कमालीची वाढ केली आहे. दुसरीकडे, रोडवेज आणि रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी त्याच किमतीत अधिक बस आणि अधिक रेल्वे गाड्या धावत आहेत, परंतु विमान कंपन्या या संधीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. (हेही वाचा: 7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांना सरकारचा मोठा झटका; समोर आला DA वाढवण्याबाबत नवीन अपडेट)

दरम्यान, रशिया-युक्रेन युद्धानंतर कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे जगभरात इंधनाचे दर वाढले आहेत. त्याच वेळी, एटीएफची किंमत 1 लाख प्रति किलोलिटरच्या पुढे गेली आहे. भारतात एटीएफच्या किमती एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढल्याची ही पहिलीच वेळ आहे. ऑगस्ट 2008 मध्ये, जेव्हा कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल $147 वर पोहोचली तेव्हा भारतातील ATF ची किंमत प्रति किलोलिटर 71,028 होती.