
राम मंदिर बांधकामाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी इमारत बांधकाम समितीची 3 दिवसांची बैठक आज अयोध्येत सुरू झाली आहे. समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा (Nrupendra Mishra) यांच्याकडून सुरू असलेल्या बांधकाम कामाची पाहणी केली जात आहे. पाहणीनंतर त्यांनी पराकोटाच्या बांधकामाच्या प्रगतीची आणि त्याच्या बाहेर बांधल्या जाणाऱ्या सात मंदिरांची माहिती दिली. यावेळी त्यांनी माहिती देताना मुख्य मंदिर ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये बांधून पूर्ण होईल असं म्हटलं आहे.
नृपेंद्र मिश्रा यांनी माहिती देताना परकोटा आणि सप्त मंदिरांमध्ये संत आणि देवांच्या मूर्तींची स्थापना सुरू झाली आहे. मुख्य मंदिराच्या पहिल्या मजल्यावर राम दरबाराची मूर्ती आणि शेषावतार मंदिराच्या मूर्ती आहेत. 23 मे दिवशी गर्भगृहात राम दरबाराची मूर्ती स्थापन केली जाईल. याशिवाय, 30 मे पर्यंत शेषावतार मंदिरात लक्ष्मण मूर्ती देखील स्थापन होईल. राम मंदिराच्या राम दरबाराचा अभिषेक 3 जूनपासून सुरू होईल आणि 5 जून रोजी पूर्ण होईल. भाविकांच्या दर्शनाची तारीख राम मंदिर ट्रस्ट ठरवेल.
दररोज 750 भाविकांना पासद्वारे राम मंदिराच्या पहिल्या मजल्यावरील राम दरबारात जाण्याची परवानगी दिली जाईल. 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' या तत्त्वावर दर तासाला ५० पास दिले जातील. सुरुवातीच्या तीन महिन्यांत मंदिराचा लोड फॅक्टर तपासला जाईल.
मंदिराच्या पॅरामीटर्सच्या आधारे, रुरकीच्या शास्त्रज्ञांनी दर तासाला 50 भाविकांना पहिल्या मजल्यावर जाण्याची परवानगी दिली आहे. मंदिरात 10 सेन्सर बसवण्यात आले आहेत, जे दगडांच्या हालचाली आणि भूकंपाच्या संकेतांची माहिती देतात. या सेन्सर्सद्वारे, मंदिरावरील भाराचा तीन महिने अभ्यास केला जाईल.
नृपेंद्र मिश्रा म्हणाले की, राम मंदिराची सीमा आणि सभागृह वगळता मंदिर संकुलाचे सर्व बांधकाम डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण होईल.
महाराष्ट्रीयन सागवान लाकडापासून बनवलेले दरवाजे
पहिल्या मजल्यावर सोन्याचे दरवाजे बसवले जाणार नाहीत, त्याऐवजी महाराष्ट्रीयन सागवान लाकडापासून बनवलेले दरवाजे बसवले जातील. तळमजल्यावरील दरवाजे आधीच सोन्याने मढवलेले आहेत. मंदिराच्या शिखरावर सोने लावण्याचे काम सुरू आहे, जे जुलै अखेर पूर्ण होईल. मंदिरातील सोन्याचे प्रमाण आणि वापर याची माहिती पुढील दोन दिवसांत दिली जाईल. देवतांचे अलंकार आणि शस्त्रे सोन्याची असतील.