वाशिम येथील आर्थिक संकटाने त्रस्त शेतकऱ्याचा अनोखा निषेध

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमाफी (Farm Loan Waiver) होणार नसल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितले की, शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणे शक्य होणार नाही. तरी त्यांनी शेतकऱ्यांना 31 मार्चपूर्वी बँकेचे कर्ज फेडण्याचे आवाहन केले होते. या निर्णयावर गदारोळ सुरु असताना आता, महाराष्ट्रातील वाशिम (Washim) जिल्ह्यात एका शेतकऱ्याने सरकारी धोरणाविरुद्ध एक अनोखा निषेध केला आहे. येथील आडोली नावाच्या गावात राहणारे शेतकरी सतीश इडोले यांनी आपले अवयव विक्रीसाठी ठेवले आहेत.

सतीश यांचा एक व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ते वाशिमच्या मुख्य बाजारपेठेत असून, त्यांच्या गळ्यात एक बॅनर लटकलेला दिसत आहे. या बॅनरवर ठळक अक्षरात लिहिले आहे, ‘शेतकऱ्यांचे शरीराचे अवयव खरेदी करा'. या घोषणेखाली त्यांनी त्यांच्या शरीराच्या अवयवांची किंमत लिहिली आहे. सध्या या निदर्शनाची सर्वत्र चर्चा होत आहे.

सतीश यांनी त्यांच्या अवयवांच्या किंमती बॅनरवर लिहिल्या होत्या, यामध्ये किडनीची किंमत 75 हजार रुपये, यकृताची किंमत 90 हजार रुपये आणि डोळ्यांची किंमत 25 हजार रुपये लिहिली होती. गर्दीच्या चौकात, सतीश हा बॅनर परिधान करून उभे होते. यामुळे साहजिकच सर्वांचे लक्ष त्यांच्याकडे गेले. यासह जिल्हा दंडाधिकारी कार्यालयाच्या वतीने त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवले आहे. यामध्ये त्यांनी लिहिले आहे की, 'निवडणुकांपूर्वी देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, जर त्यांचे सरकार आले तर शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जाईल. माझ्याकडे कर्ज फेडण्यासाठी पैसे नाहीत आणि मला आत्महत्येशिवाय दुसरा कोणताही मार्ग दिसत नाही.’

वाशिम येथील आर्थिक संकटाने त्रस्त शेतकऱ्याचा अनोखा निषेध-

शेतकरी सतीश इडोले यांच्याकडे दोन एकर शेती आहे. माहितीनुसार, त्यांच्यावर महाराष्ट्र बँकेचे सुमारे 1 लाख रुपयांचे पीक कर्ज आहे. सतीश म्हणाले की, सत्तेत असलेल्या लोकांनी निवडणुकीपूर्वी आश्वासन दिले होते की जर त्यांचे सरकार सत्तेत आले तर ते शेतकऱ्यांचे कर्ज माफ करतील. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अलीकडेच सांगितले आहे की कर्जमाफी होणार नाही आणि शेतकऱ्यांनी कर्ज फेडले पाहिजे. आता कर्ज फेडण्यासाठी पैसे नसल्याने त्यांनी आपले अवयव विक्रीसाठी ठेवले आहे. (हेही वाचा: New Ready Reckoner Rates in Maharashtra: महाराष्ट्रात मालमत्ता खरेदी करणे झाले महाग; रेडी रेकनर दरात सरासरी 4.39 टक्के वाढ)

पत्रकारांशी बोलताना सतीश यांनी आपली असहाय्यता व्यक्त केली. सतीश यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी सरकारला सांगितले की जर त्यांच्या किडनीच्या किंमतीनेही त्यांचे कर्ज फेडले नाही तर त्यांच्या पत्नीच्या किडनीची किंमत 40 हजार रुपये, मोठ्या मुलाच्या किडनीची किंमत 20 हजार रुपये आणि धाकट्या मुलाच्या किडनीची किंमत 10 हजार रुपये आहे. या किडनी घ्या आणि त्यांना कर्जातून मुक्त करा. आपले अवयव विकण्याशिवाय कोणताही पर्याय नसल्याचे ते म्हणाले.