Sikandar Poster | (Photo Credits: X)

बॉलिवूडचा एकेकाळचा सुपरस्टार सलमान खान (Salman Khan) सध्या त्याच्या सिकंदर (Sikandar) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट 30 मार्च 2025 रोजी ईद-उल-फितरच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाला. मात्र बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट सपशेल आपटल्याचे दिसत आहे. हा चित्रपट दिग्दर्शक ए.आर. मुरुगादॉस यांनी दिग्दर्शित केला असून, साजिद नाडियाडवालाने त्याची निर्मिती केली आहे. माहितीनुसार, सिकंदर, प्रेक्षकांना प्रभावित करण्यात अपयशी ठरला आहे आणि त्याच्या खराब कामगिरीमुळे, थिएटर मालकांना तो इतर चित्रपटांनी बदलण्यास भाग पाडले आहे. आठवड्याच्या शेवटी मुंबईतील अनेक चित्रपटगृहांमधून सिकंदर काढून टाकण्यात आला असून, त्याऐवजी एम्पूरन, द डिप्लोमॅट आणि अगदी गुजराती चित्रपट लावण्यात आले आहेत.

वृत्तानुसार, कांदिवलीच्या आयनॉक्स, रघुलीला मॉलमध्ये 'सिकंदर'चा संध्याकाळ आणि रात्रीचा शो गुजराती चित्रपट 'उम्बारो' ने बदलला आहे. 1 एप्रिल रोजी थिएटरमध्ये 'सिकंदर'चा रात्री 9.30 चा शो रद्द करण्यात आला आणि त्याऐवजी 'द बेस्ट पांड्या' नावाचा दुसरा गुजराती चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. कारण 'सिकंदर' दाखवण्यापेक्षा गुजराती चित्रपट दाखवणे थिएटर मालकांसाठी अधिक फायदेशीर असल्याचे सांगितले जाते.

सिनेपोलिस सीवूड्स आणि पीव्हीआर, ओरियन मॉल येथे संध्याकाळी 5.30 आणि 9.30 वाजता होणारे शो मोहनलाल आणि पृथ्वीराज सुकुमारन यांच्या 'एम्पुरान' चित्रपटाने बदलले आहेत, जो वादात अडकला असूनही त्याला सिकंदरपेक्षा जास्त प्रेक्षक आहेत. आयनॉक्स नरिमन पॉइंट येथे रात्री 8 वाजता होणारा सिकंदरचा शो आणि आयकॉनिक मेट्रो आयनॉक्स थिएटरमध्ये रात्री 8.30 वाजता होणारा शो आता जॉन अब्राहमच्या 'द डिप्लोमॅट' या चित्रपटाने बदलला आहे, जो 14 मार्च रोजी प्रदर्शित झाला. (हेही वाचा: Fawad Khan च्या बॉलिवूड मधील कमबॅकला मनसेचा विरोध; Abir Gulaal सिनेमा महाराष्ट्रात रीलीज होऊ न देण्याचा इशारा)

साधारण 200 कोटी रुपयांच्या बजेटवर बनलेला, 'सिकंदर' हा वर्षातील सर्वात अपेक्षित चित्रपटांपैकी एक होता, परंतु तो प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करू शकला नाही. पहिल्या दिवशी 26 कोटी रुपयांची कमाई करून बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाची सुरुवात निराशाजनक झाली होती. दुसऱ्या दिवशी 29 कोटी रुपयांची थोडीशी वाढ झाली असली तरी तिसऱ्या दिवशी तो 30 टक्क्यांहून अधिक घसरला. मंगळवारी त्याने फक्त 19.50 कोटी रुपये कमावले. सिकंदरचा एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन आता 74.50 कोटी रुपये झाले आहे.