
आठ वर्षांनंतर पाकिस्तानी अभिनेता फवाद खान (Fawad Khan) 'अबीर गुलाल'(Abir Gulaal) सिनेमामधून बॉलिवूड मध्ये पुनरागमन करण्यासाठी सज्ज आहे. पण हा सिनेमा महाराष्ट्रात रीलीज होऊ देणार नसल्याची भूमिका मनसे ने घेतली आहे. आपली आक्रमक भूमिका मांडताना अमेय खोपकर यांनी 'अबीर गुलाल’ हा चित्रपट भारतात प्रदर्शित होऊ देणार नाही म्हणजे नाही. ज्यांना पाकिस्तानी कलाकारांना डोक्यावर घ्यायचंय त्यांनी खुशाल घ्या, पण लक्षात ठेवा सामना आमच्याशी आहे.' अशी पोस्ट केली आहे. नुकताच ‘अबीर गुलाल’ चा टीझर रीलीज करण्यात आला आहे. या सिनेमामध्ये फवाद खान सोबत वाणी कपूर ने काम केले आहे.
'अबीर गुलाल' हा चित्रपट 9 मे 2025 रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे. हा एक रोमँटिक कॉमेडी चित्रपट आहे, ज्यामध्ये फवाद खान आणि वाणी कपूर व्यतिरिक्त, रिद्धी डोगरा, लिसा हेडन, फरीदा जलाल आणि सोनी राजदान यांसारखे कलाकार दिसणार आहेत. मात्र कालच टीझर नंतर या सिनेमावरून वाद रंगायला सुरूवात झाली आहे.
अमेय खोपकर यांचा इशारा
पाकिस्तानी कलाकारांचे चित्रपट भारतात प्रदर्शित होऊ देणार नाही, हे इतक्या वेळा सांगूनही काही नासके आंबे उपटतातच. मग त्यांना कचऱ्यात टाकायचं काम मनसैनिकांनाच करावं लागणार आणि आम्ही ते करणार, करत राहणार… ‘अबीर गुलाल’ हा चित्रपट भारतात प्रदर्शित होऊ देणार नाही म्हणजे नाही. ज्यांना…
— (@MNSAmeyaKhopkar) April 2, 2025
फवाद खानने बॉलिवूड मध्ये 2014 मध्ये 'खूबसूरत' चित्रपटातून बॉलिवूड मध्ये आला. त्यानंतर फवादने 'कपूर अँड सन्स' (2016) आणि 'ऐ दिल है मुश्किल' (2016) सारख्या चित्रपटांमध्ये काम केलं.
2023 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम करण्यास पूर्णपणे बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली असली तरी, अनेक राजकीय पक्ष आणि चित्रपट संघटना त्याचा विरोध करत आहेत. त्यानंतर, सध्या भारतात, विशेषतः महाराष्ट्रात, चित्रपटगृहांमध्ये अबीर गुलालचे भविष्य अनिश्चित असल्याचे दिसून येते.