
बहुतेक लोकांना आईस्क्रीम (Ice Cream), सॉफ्ट ड्रिंक्स आणि आईस्क कँडी सारख्या गोष्टी खायला आवडतात, विशेषतः उन्हाळ्यात लोक आईस्क्रीम खूप आवडीने खातात. पण या गोष्टी खाल्ल्याने आरोग्यावरही वाईट परिणाम होऊ शकतो. कारण ते बनवण्यासाठी वापरले जाणारे घटक आरोग्यासाठी हानिकारक असू शकतात. अलिकडेच याबाबत एक बातमी समोर आली आहे, ज्यामध्ये अन्न सुरक्षा आणि औषध प्रशासनाने (FDA) कर्नाटकातील (Karnataka) काही स्थानिक आइस्क्रीम, सॉफ्ट ड्रिंक आणि आइस कँडी उत्पादन युनिट्सन निकृष्ट दर्जाचे उत्पादने विकत असल्याचे म्हटले आहे. हा प्रकार उन्हाळ्याच्या हंगामात उघडकीस आला आहे, ज्या काळात आइसक्रीम आणि थंड पेयांची मागणी खूप वाढते. या गैरप्रकारांमुळे लोकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे.
वृत्तानुसार, एफडीएच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, अशा 220 दुकानांपैकी 97 दुकानांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत, तर इतरांना योग्य साठवणुकीची परिस्थिती राखण्यात अयशस्वी झाल्याबद्दल इशारा देण्यात आला आहे. तपासणीदरम्यान एक धक्कादायक घटना समोर आल्याचे एफडीएच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. आईस्क्रीमचा पोत मलईदार बनवण्यासाठी त्यात डिटर्जंट पावडरचा वापर केला जात होता. याशिवाय, सॉफ्ट ड्रिंक्स बनवण्यासाठी फॉस्फोरिक अॅसिडचा वापर केला जात आहे. हे आम्ल हाडांसाठी हानिकारक आहे. यावर विभागाने एकूण 38,000 रुपयांचा दंड ठोठावला.
अन्नाची गुणवत्ता आणि तयारी पद्धतींचे मूल्यांकन करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून विभागाने दोन दिवस ही तपासणी केली. अधिकाऱ्यांनी आइस्क्रीम आणि शीतपेये तयार करणाते सर्व स्थानिक उत्पादन युनिट्स तपासले. तपासणी दरम्यान, अधिकाऱ्यांना काही ठिकाणी उत्पादनांसाठी अस्वच्छ आणि खराब साठवणुकीच्या सुविधा आढळल्या. अनेक प्रकरणांमध्ये, उत्पादन खर्च कमी करण्यासाठी डिटर्जंट, युरिया किंवा स्टार्चपासून बनवलेले कृत्रिम दूध वापरले जात होते. चव आणि रंग वाढवण्यासाठी नैसर्गिक साखरेऐवजी सॅकरिन किंवा अनधिकृत रंगांसारखे हानिकारक पदार्थ वापरले जात होते.
बहुतेक युनिट्स बर्फाच्या कँडी आणि पेयांमध्ये स्वच्छ पाणी वापरत नसल्याचे किंवा निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त प्रमाणात फ्लेवरिंग एजंट्स घालत असल्याचे देखील लक्षात आले. विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, या उत्पादनांमध्ये वापरले जाणारे स्वाद, आवश्यक वस्तू आणि रंग बहुतेकदा मान्यताप्राप्त पुरवठादारांकडून खरेदी केले जात नाहीत. विभागाने 590 आस्थापनांचा समावेश असलेल्या रेस्टॉरंट्स, मेस आणि हॉटेल्सची तपासणी देखील पूर्ण केली. 214 हॉटेल्समध्ये योग्य कीटक नियंत्रण उपाययोजना न केल्याचे आढळून आले, ज्यामुळे 1,15,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. (हेही वाचा: Insect in Breakfast Sambar: लोकप्रिय इडली सेंटरमधील सांबारमध्ये आढळला किडा; वाघोलीमधील घटना, व्हिडीओ व्हायरल)
दरम्यान, या गैरप्रकारांमुळे पचनसंस्थेच्या समस्या, श्वास घेण्यास त्रास आणि कालांतराने यकृत व मूत्रपिंडांचे नुकसान होऊ शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे. डिटर्जेंट पावडर हे मुळात कपडे धुण्यासाठी वापरले जाते, ते खाण्यासाठी योग्य नाही. त्यामुळे असे पदार्थ खाल्ल्याने गळ्यात जळजळ, पोटदुखी आणि इतर गंभीर आजार उद्भवू शकतात. थंड पेयांमधील फॉस्फोरिक ऍसिडमुळे हाडे ठिसूळ होण्याचा धोका वाढतो, विशेषतः लहान मुलांसाठी आणि वृद्धांसाठी हा मोठा धोका आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेता, नागरिकांना सावध राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. लोकांनी फक्त नामांकित ब्रँड्सची उत्पादने खरेदी करावीत आणि स्वस्तात मिळणाऱ्या स्थानिक वस्तूंवर अवलंबून राहणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. या घटनेमुळे अन्न सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.