सेक्स पॉवर वाढविण्यासाठी सापाचा वापर? 3 कोटी रुपये किमतीच्या सँड बोआ प्रजातीच्या सापासह दिल्ली पोलिसांकडून एकास अटक
Snake | (Images for symbolic purposes only । Photo Credits: pixabay)

सँड बोआ (Sand Boa Snake) प्रजातिच्या सापासह एका व्यक्तिस दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) अटक केली आहे. जय प्रकाश शर्मा असे या व्यक्तिचे नाव आहे. तो राजधानी दिल्ली (Delhi) येथील रोहिणी सेक्टर - 16 परिसरात राहणारा आहे. जय प्रकाश शर्मा याच्याकडे सँड बोआ प्रजातिचा साप असून, दिल्लीतील शिवा मार्केट बस सँड परिसरात या सापाचा व्यवहार होणार असल्याची माहिती पोलिसांना खबऱ्याकडून मिळाली होती. प्राप्त माहितीनुसार सापळा रचून पोलिसांनी जय शर्मा यास अटक केली. दरम्यान, या सापाचा वापर प्रामुख्याने सेक्स पॉवर वाढविण्यासाठी, अंमली पदार्थ, महागडे परफ्यूम्स तसेच कर्करोग आजारावर उपचारासाठी विदेशात केला जातो असे समजते. आंतरराष्ट्रीय बाजारात या सापाची किंमत तीन कोटी रुपयांपेक्षाही अधिक असल्याचे सांगण्यात येते.

सापांची तस्करी हा काही नवा प्रकार राहिला नाही. महाराष्ट्रासह देशभरात अनेक ठिकाणी सापांची तस्करी केली जाते. हे पोलिसांनी सर्पतस्करांना पकडलेल्या विविध घटनांतून अनेकदा स्पष्ट झाले आहे. केवळ सापच नव्हे तर कोणताही प्राणी, पक्षी अथवा व्यक्ती तसेच विशिष्ट प्रकारचे झाड, झाडाचा भाग आदींची तस्करी करणे कायद्याने गुन्हा आहे. असे असले तरी, अशा प्रकारची तस्करी होत असल्याची अनेक उदाहरणे, घटना यापूर्वीही उघडकीस आल्या आहेत. (हेही वाचा,साप चावल्यावर या 7 प्रकारे मानवी शरीरात चढते विष, होतो मृत्यू; वाचा महत्त्वपूर्ण माहिती )

दरम्यान, नवी मुंबईतील पनवेल परिसरातही अलिकडेच एका सर्पतस्कराच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या होत्या. महाराष्ट्रातील इतरही अनेक ठिकाणांहून पोलिसांनी कर्तव्यदक्षता दाखवत सर्पतस्करांना अटक केली आहे. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी विश्वाचे अभ्यासक सांगतात की, अनेक देशांमध्ये स्थानिक पातळीवरुन ते आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत तस्करीच्या रॅकेटचे जाळे विस्तारलेले असते. यात अनेकदा अनेक मोठे लोग सहभागी असतात. परंतू, त्यांचा अशा गुन्ह्यांमध्ये प्रत्यक्ष सहभाग नसतो. काही टोळ्यांकरवी ते ही कामे करवून घेत असतात. राजधानी दिल्ली येथे अटक करण्यात आलेल्या जय प्रकाश शर्मा नावाच्या व्यक्तीचाही अशाच कोणत्या रॅकेटशी संबंध आहे का? याबाबत दिल्ली पोलीस तपास करत आहेत.