
दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे (Aam Adami Party) नेते मनीष सिसोदिया (Manish Sisodiya) यांचे स्वीय सहाय्यक देवेंद्र शर्मा शनिवारी दिल्लीतील कथित दारू घोटाळ्याप्रकरणी मनी लाँड्रिंगची चौकशी करणाऱ्या सक्तवसुली संचालनालयाच्या (ED) चौकशीत सामील होण्याची शक्यता आहे. शर्मा यांचा सिसोदिया यांच्याशी सामना होण्याचीही शक्यता आहे. ईडीने त्यांना शुक्रवारी समन्स बजावले होते. या प्रकरणी ईडीला सिसोदिया यांना आणखी पाच दिवसांची कोठडी मिळाली आहे. चौकशीदरम्यान माजी सचिव सी. अरविंद, अबकारी सचिव अरवा गोपी कृष्णा आणि संजय गोयल यांना समोरासमोर आल्याचे ईडीने यापूर्वी न्यायालयाला सांगितले होते. (Delhi Excise Policy Case: मनीष सिसोदियांच्या ED कोठडीत 5 दिवसांची वाढ; राऊस अॅव्हेन्यू कोर्टाचा निर्णय)
ईडीने न्यायालयात आपली बाजू मांडताना म्हटले आहे की, सिसोदिया यांचा रिमांड मिळाला नाही, तर आतापर्यंत जो काही तपास केला गेला आहे तो व्यर्थ जाईल. त्याचवेळी, सिसोदिया यांच्या वकिलाने युक्तिवाद केला की, सात दिवसांत केवळ 11 तासांची चौकशी झाली आहे. तथापी, आपली चौकशी होत नसल्याचा दावा सिसोदिया यांनी केला आहे. ईडीने सिसोदियाच्या पुढील कोठडीची मागणी केली आणि सांगितले की सी.अरविंद यांना पुन्हा सामोरे जावे लागेल. त्यांच्याशिवाय ईडीला साक्षीदार दिनेश अरोरा आणि आरोपी अमित अरोरा यांचीही चौकशी करायची आहे. ईडीने म्हटले आहे की त्यांनी मोठ्या प्रमाणात क्लाउड डेटा जप्त केला आहे, ज्याची ते चौकशी करत आहेत.