Manish Sisodia (Photo Credits: PTI)

Delhi Excise Policy Case: राऊस अॅव्हेन्यू कोर्टाने (Rouse Avenue Court) मनीष सिसोदियांच्या (Manish Sisodia) ईडी कोठडीत (ED Custody) आणखी पाच दिवसांची वाढ केली आहे. त्यामुळे आता सिसोदिया 22 मार्चपर्यंत तुरुंगात राहणार आहेत. मनीष सिसोदिया यांना आज दिल्लीतील कथित दारू घोटाळ्याप्रकरणी मनी लाँड्रिंगची चौकशी करणाऱ्या अंमलबजावणी संचालनालयाने न्यायालयात हजर केले होते. सिसोदिया यांची कोठडी आज संपत होती. मात्र, ईडीने कोर्टाकडे सिसोदिया यांच्या आणखी सात दिवसांची कोठडी मागितली.

ईडीने न्यायालयात आपली बाजू मांडताना म्हटले आहे की, सिसोदिया यांचा रिमांड मिळाला नाही, तर आतापर्यंत जो काही तपास केला गेला आहे तो व्यर्थ जाईल. त्याचवेळी, सिसोदिया यांच्या वकिलाने युक्तिवाद केला की, सात दिवसांत केवळ 11 तासांची चौकशी झाली आहे. तथापी, आपली चौकशी होत नसल्याचा दावा सिसोदिया यांनी केला आहे. रात्रभर मला फक्त बसून ठेवलं. निदान चौकशी तरी करा, असं सिसोदिया यांनी म्हटलं आहे. (हेही वाचा - Manish Sisodia Bail Application: मनीष सिसोदिया यांनी राऊस एव्हेन्यू कोर्टात दाखल केली जामीन याचिका)

ईडीने न्यायालयाला सांगितले की, तपास सध्या गंभीर टप्प्यावर आहे, जर आत्ताच कोठडी मिळाली नाही तर सर्व मेहनत व्यर्थ जाईल. तपास यंत्रणेने सांगितले की, सिसोदिया यांची सीसीटीव्हीच्या देखरेखीखाली चौकशी सुरू आहे. 18 व 19 रोजी दोन जणांना जबाब नोंदवण्यासाठी बोलावण्यात आले आहे.

दरम्यान, कोर्टाने मनीष सिसोदिया यांना त्यांच्या कुटुंबाच्या खर्चासाठी धनादेशावर स्वाक्षरी करण्याची परवानगी दिली आहे. सिसोदिया यांच्या कुटुंबासाठी 40 हजार रुपयांच्या धनादेशावर आणि पत्नीच्या वैद्यकीय उपचारासाठी 45 हजार रुपयांच्या धनादेशावर स्वाक्षरी करण्याची परवानगी न्यायालयाने दिली आहे.