Cyclone Fani | (Photo Credits: Twitter/ ANI)

Cyclone Fani Updates: फनी वादळ आता रौद्र रुप धारण करण्याची शक्यता आहे. या वादळामुळे आंध्र प्रदेश (Andhra Pradesh) राज्यात मुसळधार पाऊस सुरु झाला आहे. तर, वादळाचा तडाख्याच्या भीतीने ओडीसा ( Odisha) राज्यातील 8 लाख लोकांनी सुरक्षेच्या कारणास्तव आपली घरं सोडली आहेत. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार Cyclone Fani शुक्रवार पर्यंत ओडीसामध्ये पोहोचू शकते. वादळादरम्यान, प्रति तास 200 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.

वादळाची भयानकता ध्यानात घेऊन ओडीसा सरकारने राज्यात अतिदक्षतेचा इशारा दिला आहे. सरकारने सुरक्षेच्या कारणास्तव समुद्र किनारी राहणाऱ्या सुमारे 8 लाख लोकांना दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरीत केले आहे. Cyclone Fani वादळामुळे स्थलांतरीत झालेल्या नागरिकांच्या सेवेसाठी ओडीसा सरकारने तब्बल 900 छावण्या उभारल्या आहेत. तर, सुरक्षा दलालाही अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच, पुढील सूचना मिळे पर्यंत राज्यातील समुद्र किनाऱ्यावरील सर्व शाळा, कॉलेज बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

दरम्यान, आपत्तीदरम्यान सेवा पुरवणारी ओडीसा सरकारचा विभाग आवश्यक त्या सर्व यंत्रसामग्रीने तयार आहे. शहरांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणांवर 6-6 सदस्यांचे एक अशी एकूण 50 पथकं तैनात करण्यात आली आहेत. राज्याचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी राज्यात होणाऱ्या विधानसभा आणि लोकसभा निवडणूक मतदानास स्थगिती द्यावी अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे. (हेही वाचा, Cyclone Fani Updates: फनी वादळ ओडीसा राज्यातील गोपाळपूर, चांदबळीपर्यंत पोहोचले, नागरिकांच्या मतदीसाठी बचाव पथक सज्ज, पर्यटकांच्या सुरक्षेसाठी विशेष ट्रेन तैनात, 100 हून अधिक रेल्वे गाड्या रद्द)

फनी चक्रीवादळाचा तडाखा ओडीसा राज्यासह उत्तर पश्चिमेकडील राज्यांनाही बसण्याची चिन्हे आहे. संभाव्य धोका ध्यानात घेून ईस्ट कोस्ट रेल्वेने सुमारे 22 रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत. प्राप्त माहितीनुसार, आतापर्यंत तब्बल 103 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. दक्षिण-दक्षिणपूर्व विशाखापट्टनम येथे सकाळी 6 वाजून 50 मिनिटांनी फनी वादळाचे संकेत मिळाले. हे वादळ प्रति तास 235 वेगाने धावत असल्याची माहिती आहे.