Coronavirus in India | Representational Image | (Photo Credits: IANS)

देशात परसलेल्या कोरोना व्हायरसला थांबवण्यासाठी सरकारकडून खबरदारी घेतली जात आहे. तसेच नागरिकांना सुद्धा स्वत:ची काळजी घेण्याचे आवाहन वेळोवेळी सरकारकडून करण्यात येत आहे. देशात कोरोना व्हायरसचे संक्रमण झाल्याचा आकडा 80 च्या पार गेला आहे. तर केरळात कोरोना व्हायरसमुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. याच पार्श्वभुमीवर केंद्र सरकारने एका महत्वाच्या निर्णयाची घोषणा केली आहे. त्यानुसार जर कोरोना झालेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना 4 लाखांची मदत केली जाणार आहे. ऐवढेच नाही तर कोरोनाच्या रुग्णांसाठी काम करणाऱ्या आणि कोरोनाच्या विरोधातील मोहिमेसाठी काम करणाऱ्यांना सुद्धा मदत केली जाणार असल्याचे गृहमंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

कोरोना व्हायरसची देशातील परिस्थिती पाहता केंद्र सरकारकडून राष्ट्रीय आपत्ती घोषित करण्यात आली आहे. यामुळे आता कोरोना संक्रमित रुग्णांसाठी एसडीआरएफ यांच्याकडून मदत दिली जाणार आहे. तर जगभरात कोरोना व्हायरसमुळे चीन नंतर इटली येथे सर्वाधिक जणांचा मृत्यू झाला आहे. येथे आतापर्यंत 827 जणांचा मृत्यू झाला आहे. इटली येथे सातत्याने कोरोना व्हायरसमुळे मृतांचा आकडा वाढत असल्याने एअर इंडिया यांनी इटली येथे जाणारी सर्व उड्डाणे 28 मार्च पर्यंत रद्द केली आहेत. तर भारतातीय विमानतळावर आतापर्यंत 10 लाखापेक्षा अधिक प्रवाशांची तपासणी करण्यात आली आहे.(कोरोना व्हायरसमुळे एअर इंडियाची रोम, मिलान आणि सिओल येथील उड्डाणे रद्द)

दुसऱ्या बाजूला बहुतांश देशांनी पर्यटकांना येण्यास सुद्धा बंदी घातली आहे. तसेच विमानांचे उड्डाण सुद्धा रद्द करण्यात आले आहेत. दुसऱ्या बाजूला परदेशात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी येणे अधिकच मुश्किल झाले आहे. भारतातील काही विद्यार्थी आणि पर्यटक इटली येथे अडकले आहेत. रोम येथील विमानतळावर भारतीय विद्यार्थी अडकले असून ते मायदेशी परतण्याची वाट पाहत आहेत. दरम्यान, एअर इंडिया यांनी असे स्पष्ट केले आहे की, जो पर्यंत एखादा प्रवासी नो-कोरोना व्हायरस (No-Coronavirus Certificate) सर्टिफिकेट दाखवत नाही तो पर्यंत त्यांना विमानात प्रवेश नाकारला आहे.