अयोध्या राम मंदिर (Ram Temple In Ayodhya) भूमिपूजन कार्यक्रम येत्या 5 ऑगस्ट रोजी पार पडत आहे. दरम्यान, अयोध्येतून एक धक्कादायक बातमी येत आहे. अयोध्येतील या कार्यक्रमापूर्वी येथील मंदिराचे पुजारी प्रदीप दास (Pradeep Das) आणि सुरक्षा व्यवस्थेसाठी तैनात असलेले 16 जवान कोरोना व्हायरस (Coronavirus) संक्रमित झाल आहेत. यात अग्निशमन दलाचे जवान, पीएसी आणि पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या कर्मचाऱ्यांचा कोरोना पॉझिटीव्ह असल्याचा रिपोर्ट मिळताच प्रशासनात एकच खळबळ उडाली. या सर्वांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तिंची कोरोना व्हायरस चाचणी केली जाणार आहे.
पुजारी प्रदीप दास हे राम मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांचे सहाय्यक आहेत. मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास हे इतर 4 सहाय्यक पुजाऱ्यांच्या मदतीने राम लल्लाची सेवा करतात. प्रदीप दास यांचा कोरोना व्हायरस रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास आणि इतर तीन पुजाऱ्यांचीही कोरोना व्हायरस चाचणी घेण्याचे प्रशासनाने निश्चित केले आहे. सध्यास्थितीत प्रदीप दास यांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. तसेच, इतर 16 पोलीस कर्मचारीही होम क्वारंटाईन आहेत. (हेही वाचा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोद्धा राम मंदिर भूमिपूजन 5 ऑगस्टला होणार; देशभराती सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना कार्यक्रमाचे आमंत्रण)
येत्या 5 ऑगस्ट रोजी होणाऱ्या राम मंदिर भूमिपूजन कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणावर सुरक्षा वाढविण्यात आली आहे. मंदिरात सर्वासाधारण दीड हजारांपेक्षाही अधिक कर्मचारी तैनात असतात. त्यामुळे येत्या 5 जुलै पुर्वी सर्व कर्मचाऱ्यांची चाचणी करण्याचे प्रशासना समोर मोठे आव्हान आहे.
दरम्यान येत्या 5 तारखेच्या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. तसेच, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, लाल कृष्ण आडवाणी, आरएसएस सरसंघचालक मोहन भागवन उपस्थित राहणार असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे. मात्र, अद्याप नेमकी कोणाकोणाची उपस्थिती असेल याबाबत मात्र अधिकृत माहिती पुढे आली नाही.