कोरोना व्हायरस (Corona Virus) जगभर पसरला आहे. हजारो लोकांचा बळी, लाखो लोकांना संक्रमित करून हा विषाणू दिवसेंदिवस वाढतच आहे. केंद्रातील मोदी सरकारसोबत, बहुतेक राज्येही कोरोनव्हायरसच्या संरक्षणासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत. अनेक राज्यांत सरकारने अनेक सेवा बंद केल्या आहेत. सरकारच्या प्रयत्नांना खासगी संस्था देखील पाठिंबा देत असलेल्या दिसून येत आहेत. माध्यमांच्या वृत्तानुसार, नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडियानेही (National Restaurants Association of India- NRAI) सरकारच्या निर्णयाचे समर्थन करत, 18 ते 31 मार्च दरम्यान रेस्टॉरंट (Restaurants) बंद ठेवण्याचे निर्देश जारी केले आहेत.
माध्यमांच्या वृत्तानुसार नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशनचे म्हणणे आहे की, ग्राहक आणि कर्मचार्यांच्या सुरक्षेचा विचार करता रेस्टॉरंट बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. रेस्टॉरंटमध्ये काम करणारे बहुतेक कर्मचारी सार्वजनिक वाहतुकीचे साधन वापरतात. सार्वजनिक वाहतुकीद्वारे कर्मचार्यांमध्ये संक्रमणाचा धोका जास्त असतो आणि त्याद्वारे जास्तीत जास्त लोकांना संसर्ग होण्याचा धोका असतो. त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आला आहे. असोसिएशनने आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना 31 मार्च पर्यंत सेवा बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. (हेही वाचा: चीनचे अध्यक्ष Xi Jinping आणि राजदूत Sun Weidong यांच्याविरुद्ध याचिका दाखल; कोरोना व्हायरस मुद्दाम पसरविल्याचा आरोप)
एनआरएआयने याबाबत अॅडव्हायझरी जारी केली आहे. मात्र रेस्टॉरंट बंद ठेवायचे का नाही ते पूर्णतः मालकावर अवलंबून असणार आहे. एनआरएआयने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आम्हाला असा निर्णय घेण्यास भाग पडले. याचा परिणाम आमच्या व्यवसायावर होईल. परंतु ग्राहक, कर्मचारी आणि सामाजिक सुरक्षा लक्षात घेऊन आम्ही हा योग्य तो निर्णय घेतला आहे. दरम्यान, कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी खासगी कंपन्याही खबरदारी घेत आहेत. बर्याच कंपन्यांनी आपल्या कर्मचार्यांना घरातून काम करण्याची सुविधा दिली आहे. यामुळे कर्मचाऱ्यांचा प्रवास टळू शकतो.