भारतामध्ये आजपासून कोरोना विषाणू लसीकरणाचा (Coronavirus Vaccination) दुसरा टप्पा सुरु झाला आहे. आज पीएम मोदी, अमित शाह यांच्यासह अनेक नेत्यांनी कोरोनाची लस टोचून घेतली. या पार्श्वभूमीवर एक महत्वाची बातमी समोर येत आहे. चिनी हॅकर्स (Chinese Hackers) हे भारतीय कोविड-19 लस विकसक व उत्पादक यांना लक्ष्य करीत आहेत. सायबर इंटेलिजेंस फर्म सायफर्मा (Cyfirma) यांनी रॉयटर्सला सांगितले की, हॅकर्स भारताच्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, भारत बायोटेक, पतंजली आणि ऑल इंडिया इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) ला लक्ष्य करीत आहेत.
गेल्या काही आठवड्यांत, चिनी स्टेट-हॅकिंग गटाने दोन भारतीय लस उत्पादकांच्या आयटी सिस्टमला लक्ष्य केले आहे, ज्यांचे कोरोनोव्हायरस शॉट्स देशाच्या लसीकरण मोहिमेत वापरले जात आहेत. चीन आणि भारताने कोविड-19 लसीचे अनेक शॉट्स विविध देशांना विकले आहेत. जगात विकल्या जाणार्या सर्व लसींपैकी 60 टक्क्यांहून अधिक उत्पादन भारत एकटा करीत आहे. यामुळे साहजिकच चीनला मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे. भारताव्यतिरिक्त जपान, अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, स्पेन, इटली आणि जर्मनीसह बारा देश हॅकर्सच्या रडारवर आहेत.
सायफर्माचे मुख्य कार्यकारी कुमार रितेश म्हणाले की, APT10 हे सीरमला सक्रियपणे लक्ष्य करीत आहे, जे सध्या अनेक देशांसाठी अॅस्ट्रॅजेनेका लस तयार करीत आहेत. लवकरच सीरम नोव्हॅक्सॅक्स शॉट्स तयार करण्यास सुरवात करेल. हॅकर्सना या कंपनीचे अनेक सर्व्हर्स कमकुवत असल्याचे आढळले. कुमार रितेश पुढे असेही म्हणतात की, सायबर हल्ल्याचा मुख्य हेतू बौद्धिक संपत्ती लक्ष्य करणे आणि भारतीय कंपन्यांची असणारी मोठी स्पर्धा कमी करणे करणे हे आहे.
दरम्यान याआधी एक अहवाल समोर आला होता ज्यामध्ये म्हटले होते की, चिनी हॅकर्सनी भारताला अंधारात बुडवण्याचा प्रयत्न केला होता. एवढेच नव्हे, तर गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये मुंबईत निर्माण झालेल्या भीषण वीज संकटामागे चीनी हॅकर्स असू शकतात असा दावा त्यामध्ये केला गेला आहे.