कोरोना व्हायरसने मध्यम वर्गीय लोकांना केले कर्जबाजारी; घर चालवण्यासाठी 4 पैकी एका व्यक्तीने घेतले Loan, मुंबई व भोपाळ आघाडीवर
Money (Representational Image) (Photo Credits: Pixabay)

कोरोना व्हायरस (Coronavirus) साथीने समाजातील सर्व क्षेत्रातील लोकांच्या जीवनावर आणि अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम केला आहे. विविध उद्योगांमधील नोकऱ्या जाण्याने तसेच काही ठिकाणी झालेल्या वेतन कपातीमुळे मध्यम वर्गीय लोकांना सर्वाधिक त्रास झाला आहे. साथीच्या रोगाने कर्जे (Loans) आणि कर्जाशी संबंधित प्राधान्यक्रम बदलले आहेत. युरोप आणि आशियात कार्यरत आंतरराष्ट्रीय ग्राहक वित्त सेवा प्रदाता कंपनी होम क्रेडिटची स्थानिक संस्था, होम क्रेडिट इंडियाने (Home Credit India) लॉकडाऊन दरम्यान लोकांमधील कर्जाची पद्धत समजून घेण्यासाठी 7 शहरांमध्ये अभ्यास केला. अभ्यासानुसार 46 टक्के लोकांनी प्रामुख्याने घरातील गरजा भागवण्यासाठी कर्ज घेतल्याचे समोर आले आहे.

कर्ज घेण्याचे दुसरे सर्वात मोठे कारण वेतन कपात किंवा पगार विलंब हे आहे. 27 टक्के लोकांनी कबूल केले की कोरोनामुळे ज्या समस्या निर्माण झाल्या त्यामुळे त्यांना जुन्या कर्जाची ईएमआय परतफेड करण्यासाठी कर्ज घ्यावे लागले. नोकरी गमावल्यामुळे 14 टक्के लोकांना कर्ज घ्यावे लागले. 2019 मध्येही होम क्रेडिट इंडियाने असाच एक अभ्यास केला होता, त्यात असे दिसून आले होते की कुटुंबातील सदस्यांच्या गरजा भागवणे हे कर्ज घेण्याचे सर्वात मोठे कारण आहे. यासाठी 46 टक्के लोकांनी कर्ज घेतले होते.

कर्ज घेण्याचे दुसरे मोठे कारण म्हणजे आपली जीवनशैली सुधारणे. 33 टक्के लोकांचा असा विश्वास आहे की लाईफस्टाईल मेंटेन ठेवण्यासाठी कर्ज घेतले जाऊ शकते. जीवनशैली सुधारण्यामध्ये नवीन स्मार्टफोन/टीव्ही/फ्रीझ किंवा गाडी इत्यादींचा समावेश आहे.

अभ्यासामध्ये असेही दिसून आले आहे की, कोविड दरम्यान लोकांनी आपल्या मित्रांकडून किंवा कुटुंबातील सदस्यांकडून कर्ज घेण्यास प्राधान्य दिले. अशा परिस्थितीत कर्जफेड करण्यासाठी काही फायदे मिळतात आणि परिस्थिती सामान्य झाल्यावर किंवा नोकरी मिळाल्यानंतर अशा कर्जाची परतफेड सहजपणे केली जाऊ शकते. अभ्यासानुसार असेही दिसून आले आहे की, परिस्थिती सामान्य झाल्यावर आणि पुन्हा नोकरी मिळाल्यावर 50 टक्के लोकांनी आपले कर्ज परत केले. मित्र आणि कुटूंबातील सदस्यांकडून कर्ज घेण्यामध्ये मुंबई आणि भोपाळ आघाडीवर राहिले. येथे 27 टक्के लोकांनी अशा माध्यमातून कर्ज घेतले. दिल्लीत 26 टक्के आणि पटनामध्ये 25 टक्के लोकांनी मित्र व कुटूंबाकडून कर्ज घेतले. या काळात 4 पैकी व्यक्तीने आपले मित्र अथवा कुटुंबाकडून कर्ज घेतल्याचे समोर आले आहे.