दिल्ली: गृहमंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याची घरात घुसून हत्या
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

राजधानी दिल्ली (Delhi) येथे केंद्रीय गृहमंत्रालय (Home Ministry) खात्याच्या एका विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याची घरात घुसून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दक्षिण पूर्व दिल्ली येथील जैतापूर परिसरात ही घटना उघडकीस आली. अधिकाऱ्याच्या मृतदेहावर चाकूने वार केल्याच्या खुणाही आढळून आल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत अधिकाऱ्याचे नाव आनंद सिंह असून ते गृह मंत्रालयात वरिष्ठ ऑडिटर होते. 43 वर्षीय आनंद सिंह हे मुळचे मीठापूर येथील निवासी होते.

पोलिसांनी माहिती देताना सांगितले की, शुक्रवार किंवा शनिवारच्या दरम्यान अज्ञात आरोपींनी आनंद सिंह यांची हत्या केली असावी. अधिकाऱ्यांनी सांगितले की, आनंद सिंह यांच्या भावाने त्यांचा मृतदेह पाहिला आणि शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यांनी पोलिसांना सांगितले की, ते आपल्या सहकाऱ्यांना भेटून उशारीने घरी परतत होते. (हेही वाचा, ठाणे: कल्याण येथील APMC मार्केटमध्ये चाकूने वार करत विवाहितेची हत्या)

पोलीस उपायुक्त ( दक्षिण-पूर्व) चिन्मय बिस्वाल यांनी सांगितले की, पोलिसांनी घटनास्थळावरु मृतदेह ताब्यात घेतला तेव्हा, मृतदेहावर जखमा आणि धारधार शस्त्रांच्या खुणा सपाडल्या. पोलिसांकडून आरोपीला पकडण्यासाठी जोरदार शोधमोहीम सुरु केली आहे. मुळचे उत्तराखंड राज्यातील असलेले आनंद सिंह पत्नी आणि तिन मुलांसोबत दिल्लीत राहात होते. सोबत त्यांचा भाऊही राहात होता.