ठाणे: कल्याण येथील APMC मार्केटमध्ये चाकूने वार करत विवाहितेची हत्या
Representational Image (Photo Credits: PTI)

ठाणे जिह्ल्यातील कल्याण येथे भर बाजारात विवाहितेची चाकूने वार करत हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे. कल्याणच्या एपीएमसी मार्केटमध्ये दुपारच्या वेळेस ही घटना घडली. सनम करोतिया (24) असं हत्या करण्यात आलेल्या विवाहितेचं नाव आहे. या घटनेमुळे कल्याण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

सनम करोतिया दुपारी साडेचारच्या सुमारास स्कूटरवरुन कल्याणच्या एपीएमसी मार्केटमध्ये आल्या. स्कूटर पार्क करत असताना त्यांच्या मागून आलेल्या दोन अज्ञात इसमांनी सनम यांच्यावर वार केले आणि तेथून पळ काढला. या हल्ल्यात सनम गंभीर जखमी झाल्या. त्यानंतर त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले असता तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. मात्र ही सर्व घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तपास सुरु केल्यानंतर तासाभरातच आरोपी बाबू ढकणी (24) याला अटक करण्यात आली. मात्र हा हल्ला का करण्यात आला, याचा खुलासा अद्याप झालेला नसून पोलिस प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.