
पतीने स्वस्तातला मोबाईल भेट दिला म्हणून नाराज असलेल्या पत्नीने (वय 22 वर्षे) चक्क गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी या महिलेचे पतीसोबत कडाक्याचे भांडण झाले होते. तिला महागडा स्मार्टफोन (Smartphone) हवा होता. मात्र, पतीने तिला 7,500 रुपयांचा मोबाईल घेऊन दिला होता. पोलिसांनी घटनेची नोंद घेऊन गुन्हा दाखल केला आहे. तसेच, पत्नीच्या कुटुंबीयांनाही घडल्या प्रकाराबाबत कळवले आहे.
या घटनेचा तपास करणारे पोलीस अधिकारी एएसआय शिरोमणी सिंह यांनी सांगितले की, मृत महिला पूजा आपल्या पतीसोबत आर्य आनंद नगर येथील अशोक विहार कॉलनी येथे राहतात. मृत महिला ही सीहोर जिल्ह्यातील रहीवासी होती. तीन वर्षांपूर्वी विशाल नामक युवकाशी तिचा विवाह झाला होता. त्यांना एक छोटी मुलगीही आहे. विशाल हा फैब्रिकेशनचा व्यवसाय करतो. गेल्या काही दिवसांपासून पती पत्नींमध्ये स्मार्टफोन घेण्यावरुन वाद होता.
पोलिसांनी सांगितले की, पूजा हिला 15,000 रुपयांचा स्मार्टफोन हवा होता. परंतू, विशाल हा तिला स्वस्तातला 7500 रुपये किमतीचा स्मार्टफोन घेऊन आला. त्यामुळे पूजा आणि विशायल यांच्यात भांडण झाले. या भांडणानंतर पूजा आपल्या मुलीसोबत आपल्या बेडरुममध्ये गेली. तर, विशाल हॉलमध्ये गेला. दरम्यान, रात्रीच्या वेळी 10.30 च्या सुमारास मुलीच्या रडण्याचा आवाज आल्यानंतर विशालला जाग आली. त्याने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. परंतू, दरवाजा आतून बंद होता. त्याने दरवाजावर असलेल्या झडपेतून आत डोकावून पाहिले तर, ती पंख्याला लटकताना दिसत होती. त्याने दरवाजा उघडून तिला दवाखाण्यात नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, डॉक्टरांनी तिला उपचारापूर्वीच मृत घोषीत केले. (हेही वाचा, अहमदनगर: विवाहित तरुणाने PUBG मुळे स्वत:वर झाडल्या गोळ्या? जिल्ह्यात आत्महत्येच्या प्रकारामुळे खळबळ)
दरम्यान, पूजाने आत्महत्या कलेल्या खोलीत पोलिसांना कोणतीही सुसाईड नोट सापडली नाही.