सध्या ऑनलाइन शॉपिंगचा जमाना आहे. अनेक गोष्टी खरेदी करण्यासाठी लोक बाजारात जाण्याऐवजी थेट ऑनलाइन ऑर्डर करण्याला प्राधान्य देत आहेत. विशेषत: ऑनलाइन माध्यमातून लोक मोठ्या प्रमाणात मोबाइल फोन खरेदी करताना दिसतात. याआधी ऑनलाइन फसवणूकीसंबंधी अनेक घटना समोर आल्या आहेत. एखादी वस्तू खरेदी केल्यानंतर अनेकांना बटाटा-कांदा, वीट-दगड यांसारख्या वस्तू मिळाल्या आहेत. आता असेच ऑनलाइन फसवणुकीशी संबंधित मेक्सिको येथून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहेत.
गुआनाजुआटो (Guanajuato) येथील या व्यक्तीने ऑनलाइन स्टोअरमधून स्मार्टफोन ऑर्डर केला होता. मात्र त्याला कल्पनाही नव्हती की स्मार्टफोनऐवजी, त्याला एक धक्कादायक गोष्ट प्राप्त होईल. न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार, जेव्हा या व्यक्तीचे पार्सल घरी आले तेव्हा ते त्याच्या आईने घेतले आणि स्वयंपाकघरातील टेबलवर ठेवले. जेव्हा या व्यक्तीने मोठ्या उत्साहाने त्याचे पॅकेज उघडले तेव्हा तो थक्क झाला.
पार्सलद्वारे त्याच्या घरी बॉम्ब आला होता. पॅकेटमध्ये ग्रेनेड पाहून या व्यक्तीचे हात-पाय थरथर कापू लागले. त्यानंतर त्याने तत्काळ बॉम्बशोधक पथकाला याची माहिती दिली. एका घरी ग्रेनेड असल्याची माहिती मिळताच बॉम्ब निकामी पथकाने त्या व्यक्तीच्या घरी पोहोचून तो संपूर्ण परिसर सील केला. यानंतर लष्कराने बॉम्ब निकामी केला. ग्रेनेड निकामी झाल्यानंतर सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
आता अधिकारी हे ग्रेनेड कोणी पाठवले हे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा प्रकारची गोष्ट मेक्सिकोमध्ये बाळगणे बेकायदेशीर आहे. गेल्या 6 वर्षात मेक्सिको पोलिसांनी एकट्या गुआनाजुआटो येथून 600 हून अधिक स्फोटक उपकरणे जप्त केली आहेत. आता या नव्या घटनेमुळे तेथील लोकांच्या मनात ऑनलाइन खरेदीबाबत भीती निर्माण झाली आहे.