शनिवारी उत्तर बेंगळुरूमधील (Bengaluru) चिक्कबनावराजवळील गणपतीनगरमध्ये 35 वर्षीय महिला आणि तिची सात वर्षांची मुलगी त्यांच्या घराच्या बाथरूममध्ये मृतावस्थेत आढळून आली. 35 वर्षीय मंगला आणि खाजगी शाळेत इयता पहिलीमध्ये शिकणारी तिची मुलगी गौतमी एन असे या मायलेकींची नावे आहेत. गिझरमधून कार्बन मोनोऑक्साइडच्या गळतीमुळे गुदमरून या दोघींचा मृत्यू झाल्याचा पोलिसांना संशय आहे. मंगलाचा पती नरसिंहमूर्ती तीला दुपारपासून कॉल करत होता, मात्र तिने फोन न उचलल्याने, त्याने त्यांच्या घरमालकाला पत्नीचे काय झाले ते पाहण्याची विनंती केली. त्यानंतर दुपारी 4 वाजता ही घटना उघडकीस आली.
नरसिंहमूर्ती एका फॅब्रिकेशन फर्ममध्ये काम करतो आणि पत्नी आणि मुलीसह गणपतीनगर येथे भाड्याने घेतलेल्या घरात राहत होता. तो सकाळी कामासाठी घरून निघाला आणि दुपारी एकच्या सुमारास पत्नीला फोन केला. तिने त्याचा कॉल उचलला नाही. नंतर, त्याने अनेक वेळा कॉल करून तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याला काहीतरी चुकल्याचा संशय आला आणि त्याने घरमालकाला याबाबत जाणून घेण्यास विनंती केली.
घरमालक जेव्हा त्यांच्या घरी गेला तेव्हा, त्याला दरवाजा आतून बंद असल्याचे आढळून आले परंतु तो खिडकी उघडण्यात यशस्वी झाला. त्याला वॉशरूम बंद असल्याचे दिसले त्यामुळे त्याने बाथरूमचे दार ठोठावायला सुरुवात केली. परंतु आतून काहीच प्रतिसाद न आल्याने त्याने नरसिंहमूर्ती व पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दरवाजा तोडला त्यावेळी आतमध्ये मंगला आणि गौथमी या दोघीही मृतावस्थेत आढळल्या. (हेही वाचा: Jharkhand Shocker: दारुसाठी गर्भवती बायकोने नवऱ्याला पैसे देण्यास दिला नकार, संपातलेल्या व्यक्तीने गळा दाबून केली हत्या)
याबाबत एका अधिकाऱ्याने सांगितले की, सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास दोघी अंघोळीसाठी गेल्या होत्या. आंघोळ करताना त्यांनी खिडक्या बंद केल्या होत्या. बाथरूममधील निकृष्ट गॅस गिझरमधून बाहेर पडलेल्या कार्बन मोनॉक्साईडमुळे त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्याच अवस्थेत त्यांचा गुदमरून मृत्यू झाल्याचा आम्हाला संशय आहे.’ पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे. यामागचे ठोस कारण शवविच्छेदनानंतर समोर येईल.