Ram lalla | Twitter

राम नवमी (Ram Navami 2025) हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे, जो देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. रामनवमी हा सण भगवान श्रीरामांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. धार्मिक श्रद्धेनुसार, भगवान श्री राम यांचा जन्म चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला अयोध्येत झाला होता. म्हणून, दरवर्षी या दिवशी रामनवमीचा उत्सव साजरा केला जातो. यंदा  रामनवमी रविवारी, 6 एप्रिल 2025 रोजी साजरी केली जाईल. अयोध्येत भगवान राम यांच्या जयंतीची तयारी जोरात सुरू आहे. यावेळी रामनवमीचा सण खूप खास असणार आहे. रामनवमीदिवशी अभिषेक सकाळी 9.20 वाजता सुरू होईल आणि 10.30 पर्यंत चालेल. यानंतर, प्रभूला नवीन कपडे घातले जातील. काही काळ पडदा ओढला जाईल आणि नंतर 11.50 वाजेपर्यंत प्रभूंचे दर्शन घेता येईल. याचे थेट प्रक्षेपणही केले जाणार आहे.

दुपारी ठीक 12 वाजता भगवान रामलल्लाचा सूर्यटिळक होईल. सूर्य अभिषेकानंतर, महाआरती आयोजित केली जाईल. अयोध्येत ऐतिहासिक रामनवमी मेळा 2025 ची जय्यत तयरी सुरु आहे. नऊ दिवसांचा रामनवमी मेळा 30 मार्च रोजी सुरू होत आहे आणि त्याचा समारोप 6 एप्रिल रोजी मुख्य कार्यक्रमात होईल. अधिकाऱ्यांचा अंदाज आहे की, यावेळी 50 लाखांहून अधिक भाविक शहरात येतील, त्यामुळे निवासाची मोठी टंचाई निर्माण होईल. हॉटेल्स आणि धर्मशाळा जवळजवळ भरल्या आहेत, 90% खोल्या आधीच बुक केल्या आहेत. उर्वरित निवासस्थानांना मोठी मागणी आहे, हॉटेल व्यावसायिकांकडे दररोज चौकशी होत आहे. पारंपारिक निवासस्थाने संपत असल्याने, बरेच भाविक होमस्टे, मंदिरे आणि आश्रमांकडे वळत आहेत, परंतु ही देखील पूर्ण भरलेली आहेत.

भाजपचे शहराध्यक्ष कमलेश श्रीवास्तव यांनी नमूद केले की, दररोज सत्तर हजार ते ऐंशी हजार भाविक रामलल्लाच्या दर्शनासाठी येतात. रामजन्मोत्सवात दररोज अडीच ते तीन लाख लाख भाविक येतील, ज्यामुळे हा अयोध्येतील सर्वात मोठ्या मेळाव्यांपैकी एक बनेल. या उत्सवात रामकथा, रामनाम संकीर्तन, पारायण, यज्ञ आणि हवन असे आध्यात्मिक कार्यक्रम होणार आहेत. गेल्या दोन महिन्यांत अयोध्येत तीन कोटींहून अधिक यात्रेकरूंनी दर्शन घेतले आहे. श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने उत्सव सुरळीत पार पाडण्यासाठी व्यापक व्यवस्था केली आहे. (हेही वाचा: Ram Navami 2025 Date: जाणून घ्या यंदा कधी आहे रामनवमी; या दिवसाचे महत्व व मध्याह्न मुहूर्त)

राम नवमीच्या दिवशी सूर्य टिळक, धार्मिक अभिषेक, भव्य शृंगार  होईल आणि 56 प्रकारच्या भोगांचा भव्य नैवेद्य दाखवला जाईल. दरम्यान, राम हे विष्णूंच्या सातव्या अवतार मानले जातात. भगवान श्रीराम हे हिंदू धर्मातील सात्त्विकतेचे प्रतीक मानले जातात. त्यांच्या जीवनचरित्रातून धर्म, सत्य, न्याय आणि मर्यादा पालनाचे धडे मिळतात. राम नवमीच्या निमित्ताने भक्तगण त्यांच्या गुणांचे स्मरण करून आपल्या जीवनात त्यांची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करतात.