Ram lalla | Twitter

Ayodhya Ram Mandir Live Aarti: यावर्षी जानेवारी महिन्यात अयोध्या येथे रामलल्लाच्या मंदिराचे (Ayodhya Ram Mandir) उद्घाटन झाले. त्यानंतर प्रभू रामाचे दर्शन घेण्यासाठी भक्त इथे मोठ्या प्रमाणावर गर्दी करत आहेत. आता दूरदर्शन नॅशनल वाहिनीवर अयोध्येतील श्री रामलल्ला मंदिरातून दररोज भव्य आरतीचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. दूरदर्शन नॅशनल श्री रामलल्ला मंदिरातून दररोज सकाळी 6.30 वाजता या आरतीचे थेट प्रक्षेपण करेल. त्यामुळे भक्तांना रोज भगवान श्री रामलल्लाचे दिव्य दर्शन घेता येणार आहे.

राम मंदिरात रामलल्ला आरती रोज 5 वेळा केली जाते, ज्यामध्ये मंगला आरती, शृंगार आरती, राजभोग आरती, संध्या आरती आणि शयन आरती समाविष्ट आहेत. पहाटे साडेचार वाजता मंगला आरतीने दिवसाची सुरुवात होते. तर शेवटची आरती शयन आरती रात्री 10:00 वाजता आहे.

आरतीच्या थेट प्रक्षेपणाबाबत माहिती देताना दूरदर्शनने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले- ‘आता रोज होणार भगवान श्री रामलल्लाचे दिव्य दर्शन! अयोध्येतील श्री रामलल्ला मंदिरातून दररोज सकाळी 6:30 वाजता फक्त #DDNational वर #दैनिक आरतीचे #लाइव्ह प्रक्षेपण पहा.’ त्यामुळे जर तुम्ही अयोध्येला जाऊन रामलल्लाच्या आरतीमध्ये सहभागी होऊ शकत नसाल, तर ही तुमच्यासाठी खूप चांगली संधी आहे. दूरदर्शनद्वारे 'या' लिंकवर क्लिक करून तुम्ही दररोज सकाळी 6.30 वाजता रामलल्ला आरतीला उपस्थित राहू शकता. (हेही वाचा: CAA Rules 2024: केंद्र सरकारच्या CAA अधिसूचनेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान, मुस्लिम लीगने दाखल केली याचिका)

दरम्यान, अयोध्येतील श्री रामजन्मभूमी मंदिर या वर्षाच्या अखेरीस 2024 पर्यंत जवळपास पूर्णपणे तयार होईल, परंतु 2025 मध्येही सजावटीचे काम सुरू राहणार आहे. श्री रामजन्मभूमी संकुलात बांधण्यात येत असलेली भिंत आणि उर्वरित 6 मंदिरे आणि आतील प्रवासी सुविधा केंद्रासह सर्व बांधकाम 2025 मध्ये पूर्ण होईल. अशाप्रकारे श्री रामजन्मभूमी मंदिराचे संपूर्ण मॉडेल 2024 मध्ये दिसेल व सर्व काम 2025 पर्यंत पूर्ण होईल.