Railway Platform प्रतिकात्मक प्रतिमा (फोटो सौजन्य - फेसबुक)

सुट्ट्यांचा मौसम असतो तेव्हा अनेक प्रवासी रेल्वे स्थानकांवर, ट्रेन मध्ये वैध तिकीट नसताना देखील मोठ्या संख्येने घुसतात. यामधून अनेकदा अप्रिय घटना घडतात. चेंगराचेंगरी सारख्या घटना टाळण्यासाठी आता रेल्वे प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. या मुद्द्यावर बोलताना आज केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वे स्थानकांमध्ये वॉर रूम सुरू करणार, सीसीटीव्ही द्वारा लक्ष ठेवण्याची यंत्रणा अजून सुसज्ज करणार तर फूट ओवर ब्रीज मोठे करणार असल्याचं म्हटलं आहे. यावेळी त्यांनी आता वेटिंग लिस्ट वर असणार्‍या प्रवाशांना स्थानकामध्ये प्रवेशही दिला जाणार नसल्याचं म्हटलं आहे.

उत्सव आणि मेळ्यांमध्ये गर्दी नियंत्रित करण्यासाठी, मर्यादित प्रवेश नियंत्रण प्रणाली देखील लागू करण्यात आली आहे, ज्यामध्ये स्थानकाबाहेर नियुक्त होल्डिंग क्षेत्रे आहेत जिथे प्रवाशांना त्यांची ट्रेन येईपर्यंत वाट पहावी लागणार असल्याचं म्हटलं आहे.

देशात 60 स्थानकांवर सुरू होणार प्रतिक्षालयं

मागील वर्षी सण,उत्सवांच्या दिवसांमध्ये, महाकुंभादरम्यान सुरत, उधना, पटना आणि नवी दिल्ली येथे तसेच प्रयागराजमधील नऊ स्थानकांवर तात्पुरती प्रतीक्षालयांची निर्मिती करण्यात आली होती. या अनुभवाच्या आधारे, आता देशात 60 स्थानकांवर कायमस्वरूपी प्रतीक्षालयांची उभारणी होणार आहे.

सुव्यवस्था आणि सुरक्षितता वाढविण्यासाठी, केवळ अधिकृत आरक्षित तिकिटे असलेल्या प्रवाशांनाच प्लॅटफॉर्मवर चढण्याची परवानगी दिली जाईल. वेटिंग लिस्ट आणि तिकीट नसलेल्या प्रवाशांनी बाहेर नियुक्त केलेल्या ठिकाणी वाट पहावी लागणार आहे. अनधिकृत स्टेशन प्रवेशद्वार सील केले जातील. असे रेल्वेमंत्री म्हणाले आहेत.

CCTV Surveillance आणि War Rooms वाढवणार

प्रवाशांचा प्रवाह अधिक कार्यक्षमतेने सांभाळण्यासाठी 12 मीटर आणि 6 मीटर रुंदीचे नवीन पादचारी पूल (FOBs) बांधण्याची घोषणाही अश्विनी वैष्णव यांनी केली आहे. सर्व प्रमुख स्थानकांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जातील आणि गर्दीच्या वेळी समन्वय साधून व्यवस्थापन करण्यासाठी वॉर रूम सुरू केल्या जातील. प्रमुख स्थानकांवर वॉकी-टॉकी, घोषणा प्रणाली आणि डिजिटल कम्युनिकेशन साधने देखील असतील.

याव्यतिरिक्त, प्रमुख स्थानकांवर स्टेशन संचालकांची नियुक्ती केली जाईल ज्यांना जलद निर्णय घेण्याचे आर्थिक अधिकार असतील.