मॉब लिंचिंग विरोधात अनुराग कश्यप, अपर्णा सेन यांच्यासह 49 बॉलिवूड दिग्गजांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र
Prime Minister Narendra Modi | (Photo Credits: Getty Images)

देशातील विविध भागात गेल्या काही दिवसांपासून श्रीराम म्हणण्याची जबरदस्ती करत मारहाण करण्याच्या अनेक घटना घडत आहेत. दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या मॉब लिंचिंगच्या घटनांवर आता दिग्गज, मान्यवरांनी पाऊल उचलायला सुरुवात केली. या संदर्भातील एक पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना लिहिण्यात आले आहे. यावर रामचंद्र गुहा, अनुराग कश्यप, शुभा मुद्गल, अपर्णा सेन, कोंकणा सेन शर्मा आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. समाजातील दलित, मुस्लिम आणि वंचित लोकांवर श्रीराम बोलण्याची होणारी सक्ती आणि मारहाण या प्रकरणी या पत्रातून चिंता व्यक्त करण्यात आली असून या परिस्थितीवर ठोस पाऊलं उचलण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. (औरंगाबाद: 'जय श्री राम' ची घोषणा देण्यासाठी दोन मुस्लिम तरूणांना धमकी; आठवडाभरातील दुसरी घटना)

या घटनांसंदर्भात नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोची आकडेवारी धक्कादायक आहे. 2016 मध्ये दलितांविरोधात हिंसाचाराच्या 840 घटना घडल्या. मात्र यात दोषींवर कारवाई करण्याचे प्रमाण कमी आहे. त्यामुळेच या घटनांना चाप लावण्यासाठी कठोर कायदा करण्यात यावा, अशी मागणीही पत्राद्वारे करण्यात आली आहे. संसदेत मोदींनी  मॉब लिंचिंगच्या घटनांचा केलेला निषेध पुरेसा नसल्याचे देखील यात म्हटले आहे. (ठाणे: जय श्रीराम म्हणण्यासाठी मुस्लिम तरुणाला धमकावणाऱ्या तिघांना अटक)

'जय श्रीराम' हा भावना भडकवणारा नारा ठरत असून त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. अनेक मॉब लिचिंगच्या घटना 'श्रीराम' नावाखालीच होत आहेत.  तसंच आपले संविधान धर्मनिरपेक्ष असून देशात लोकशाही आणि प्रजासत्ताक व्यवस्था आहे. त्यामुळे कोणत्याही जाती, धर्म आणि वंशाच्या नागरिकाला समान अधिकार आहेत. म्हणूनच नागरिकांचे संविधानिक हक्क निश्चित करणे गरजेचे आहे, असेही या पत्रात म्हणण्यात आले आहे. (पश्चिम बंगाल: 'जय श्री राम' म्हणायला नकार दिल्याने मुस्लिम तरुणाला धावत्या ट्रेन मधून बाहेर फेकले)

बॉलिवूडकरांनी पत्राद्वारे व्यक्त केलेली चिंता आणि संताप यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी काय उत्तर देतात किंवा कोणते पाऊल उचलतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.