
'जय श्री राम' या घोषणेवरून धमकवण्यासाठी अजून एक घटना औरंगाबाद शहरामध्ये समोर आली आहे. रविवार ( 21 जुलै) च्या मध्यरात्री काही तरूणांनी दोन मुस्लीम तरूणांना गाठून त्यांना जबरदस्तीने 'जय श्री राम' चे नारे देण्यास लावले. त्यामुळे आता देशभरात या नारेबाजीमुळे ढवळून निघालेलं राजकारण दिवसेंदिवस कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करत असल्याचं चित्र आहे. औरंगाबाद येथील आझाद चौक परिसरात मोटार बाईक वरून जाणार्या दोन तरूणांना 'जय श्री राम' चे नारे देण्याची जबरदस्ती करत त्यांना मारहाण करण्यात आली आहे. असे वृत्त समोर आले आहे.
शेख आमीर असं मारहाण झालेल्या एका तरूणाचं नावं आहे. शेख आमीर याने ANI वृत्त संस्थेला दिलेल्या माहितीनुसार, तो त्याच्या मित्रासोबत जेव्हा कामावरून निघाला तेव्हा अचानक काहीजण एका कारमधून उतरले. त्या टोळीतील लोकांनी 'जय श्री राम' चे नारे देण्यासाठी जबरदस्ती केल्याचा दावा शेख आमीरने केला आहे. तसेच हे नारे देण्यासाठी नकार दिल्यानंतर त्यांनी आम्हांला धमकवत तेथून निघून गेले.
आझाद चौक परिसरात हा प्रकार जेथे घडला तेथील सीसीटीव्ही कॅमेर्यामध्ये कैद झाला आहे. या फूटेजच्या मदतीने पोलिस तपास सुरू आहे. तसेच ही औरंगाबाद मधील आठवड्याभरातील दुसरी घटना असल्याने मोठ्या प्रमाणात पोलिस फौज फाटा देखील तैनात करण्यात आला आहे. औरंगाबाद शहराचे पोलिस कमिशनर चिरंजीवी प्रसाद यांनी जनतेचा अफवांना बळी न पडता, कायदा व सुव्यवस्था पाळण्याचे आवाहन केले आहे. पश्चिम बंगाल: 'जय श्री राम' म्हणायला नकार दिल्याने मुस्लिम तरुणाला धावत्या ट्रेन मधून बाहेर फेकले
औरंगाबाद शहरात 18 जुलै दिवशी अशाचा प्रकारे हडको कॉर्नर भागातील मुझफ्फरनगरमध्ये 'जय श्रीराम' म्हणण्यास भाग पाडल्याची घटना समोर आली होती. या प्रकरणी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.