
स्वयंभू बाबा स्वामी नित्यानंद (Swami Nithyananda) यांच्या विरोधात अपहरणाचा (Kidnapping) गुन्हा दाखल केला आहे. अहमदाबादमध्ये (Ahemdabad) आश्रम चालवण्यासाठी स्वामी नित्यानंद यांनी मुलांना बंधक बनवून ठेवले असल्याचा आरोप त्यांच्यावर केला जात आहे. या मुलांना आपल्या अनुयायांकडून देणग्या गोळा करण्याचे कामही करवले जाते. या प्रकरणी पोलिसांनी नित्यानंद यांच्या दोन शिष्या, साध्वी प्राण प्रियनंदा आणि प्रियतत्व रिद्धि किरण यांना अटक केली आहे. या दोघींवर चार मुलांचे अपहरण करून, फ्लॅटमध्ये त्यांना ओलिस ठेवून बालमजुरी करवल्याचा आरोप आहे.
अहमदाबाद ग्रामीणचे डीएसपी केटी कमरिया यांनी सांगितले की, ‘फ्लॅट आणि योगिनी सर्वज्ञानपीठम आश्रमातून चार पैकी मुलींना मुक्त करण्यात आले आहे. त्यांचे निवेदन नोंदवल्यानंतर नित्यानंदविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.’ कमरिया यांच्यामते, आश्रमातून मुक्त करण्यात आलेल्या नऊ आणि दहा वर्षांच्या मुलींनी आपल्यावर अत्याचार केला असल्याचे आणि मजुरीची कामे करवून घेतले असल्याचे सांगितले आहे. (हेही वाचा: टांझानियातील भारतीय अब्जाधीश बेपत्ता; तपासकार्यावर करोडोंचा खर्च?)
याआधी या चारही बहिणींच्या पालकांनीही आश्रम प्रशासनावर मुलांना भेटू न देण्याचा आरोप केला. कमरिया यांनी दिलेल्या माहितीनुसार दोन बहिणींना सोडण्यात आले असून, त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. मात्र अजून दोन मुली आश्रमातच आहेत. या दोघींचा एक व्हिडिओ समोर आला होता, ज्यामध्ये दोघींनी सांगितले होती की, त्या त्रिनिदाद येथे असून स्वेच्छेने आश्रमात राहत आहेत. मुलींचे वडील जनार्दन शर्मा यांनी सोमवारी गुजरात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून, त्यांनी दावा केला आहे की, त्यांच्या मुलींचे अपहरण करून दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ त्यांना बंधक बनवून ठेवले आहे.