अरबपति मोहम्‍मद देवजी ( Photo Credit: Facebook )

जगाला चक्रावून टाकेल अशी घटना टांझानियाच्या इतिहासात पहिल्यांदाच घडली आहे. नुकतीच चीनची सर्वात श्रीमत अभिनेत्री बिंगबिंग गायब झाल्याची घटना ताजी असताना आता आफ्रिकेचे एक अरबपतीदेखील गायब झाले आहेत. तर हे अरबपती स्वतः गायब झाला नसून, आफ्रिकेतील या सर्वात तरुण अरबपतीचे अज्ञात बंदुकधाऱ्यांनी, गुरुवारी टांझानियातील प्रमुख आर्थिक शहर दार एस सलाम येथे अपहरण केले आहे. मोहम्मद देवजी असे या अरबपतीचे नाव असून ते 43 वर्षांचे आहेत. मूळ भारतीय असलेले देवजी आपल्या हॉटेलच्या जिममध्ये प्रवेश करत असताना ही घटना घडली. देवजी हे MeTL ग्रुपचे अध्यक्ष असून, त्यांचा 10 देशांमध्ये विमा, वाहतूक, लॉजिस्टिक आणि खाद्यपदार्थांचा व्यवसाय आहे.

दार-ए-सलाम चे गव्हर्नर पॉल यांनी दिलेल्या माहितीनुसार, 2 गाड्यांमधून आलेले हे गोरे लोक होते. सुरुवातीला त्यांनी हवेत गोळीबार केला आणि त्यानंतर लगेच देवजी यांचे अपहरण करण्यात आले. अपहरकर्त्यांसाठी जिमच्या दिशेकडील गेट जाणूनबुजून उघडे ठेवण्यात आले होते अशीही शंका व्यक्त केली जात आहे. हे कृत्य विदेशी राष्ट्राने केले असावे अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. पोलीस या घटनेचा शोध घेत आहेत.

2013साली देवजी जगप्रसीद्ध फोर्ब्स मासिकाच्या कव्हरपेजवर झळकले होते. या मासिकाने त्यांची संपत्ती 1.5 अब्ज डॉलर असल्याचे जाहीर करून ते टांझानियामधील एकमेव अब्जाधीश असल्याची घोषणाही केली होती. 2015मध्ये फोर्ब्सने त्यांना ‘पर्सन ऑफ द ईयर’ म्हणून निवडले होते. तसेच देवजी यांनी त्यांची अर्धी संपत्ती दान करणार असल्याची घोषणा 2016 साली केली होती.