Amey Khopkar On Sandeep Deshpande Attack: महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) सरचिटणीस आणि राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे निकटवर्तीय संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांच्यावर अज्ञातांनी हल्ला केला. ज्यामुळे देशपांडे यांना रुग्णालया दाखल व्हावे लागले. अद्यापही त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या हल्ल्यावरुन मनसे आक्रमक झाली आहे. मुंबई पोलिसांनीही घटनेची नोंद घेऊन तपास सुरु केला आहे. दरम्यान, याच प्रकरणात मनसे नेते अमेय खोपकर (Amey Khopkar) यांनी मुंबई पोलिसांकडे एक मागणी केली आहे. ज्यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. अमेय खोपकर यांनी संदीप देशपांडे हल्ला प्रकरणात थेट उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांचे नाव घेतले आहे. या दोघांची चौकशी करण्यात यावी. तसेच, चौकशीत काही आढळले तर त्यांना अटक करावी, अशी मागणी खोपकर यांनी केली आहे. या मागणीमुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.
संदीप देशपांडे हे शुक्रवारी (3 फेब्रुवारी) सकाळी मुंबई येथील दादर परिसरातील शिवाजी पार्क येथे फेरफटका मारत होते. मॉर्निग वॉक करत असलेल्या संदीप देशपांडे यांना एकटे गाठून चेहेरे झाकलेले चार लोक तिथे आले. या चौघांनी क्रिकेट स्टंपने संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला केला. ज्यात संदीप देशपांडे यांच्या हातापायांना दुखापत झाली. राजकीय पूर्ववैमनस्यातून हा हल्ला झाला असवा अशी शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे. (हेही वाचा, MNS Sandeep Deshpande: मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर जीवघेणा हल्ला, रुग्णालयात दाखल)
संदीप देशपांडे यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर मनसे आक्रमक झाली आहे. मनसे नेते अमेय खोपकर यांनी म्हटले आहे की, संदीप देशपांडे यांनी मुंबई महापालिकेतील अनेकांचे भ्रष्टाचार बाहेर काढले आहेत. त्यामुळे अनेकांना हादरे बसले आहेत. त्यामुळे आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांची या प्रकरणात चौकशी करावी. यात ते दोषी आढळले तर त्यांना अटक करावी. @#$% सारखे पाठीमागून कसले हल्ले करता. हिंमत असेल तर पुढे या. संदीप देशपांडे थंड बसणारा मनुष्य नाही. ते आपले काम करतच राहतील. सध्या ते सुखरुप आहेत. परंतू, पोलिसांनी त्यांना आवश्यक ते संरक्षण द्यावे.