Amarnath Yatra 2021: यंदा 28 जून ते 22 ऑगस्ट दरम्यान होणार अमरनाथ यात्रा
File image of Amarnath Yatra (Photo Credits: IANS)

Amarnath Yatra Dates: यंदाच्या अमरनाथ यात्रेच्या  (Amarnath Yatra) तारखा अखेर जाहीर झाल्या आहेत. यावर्षी अमरनाथ यात्रा 28 जून दिवशी सुरू होणार असून 22 ऑगस्ट दिवशी संपणार आहे. यंदा 56 दिवस अमरनाथ यात्रा चालणार आहे. मागील वर्षी कोरोना वायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर अमरनाथ यात्रा रद्द करण्यात आली होती. मात्र आता हळूहळू संकटावर नियंत्रण मिळवत असल्याने आज (13 मार्च) जम्मू कश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या अमरनाथ श्राइन बोर्ड च्या बैठकीत अमरनाथ यात्रा 2021 च्या तारखांवर निर्णय घेण्यात आला.

अमरनाथ यात्रा 2021 साठी रजिस्ट्रेशन (Amarnath Yatra Registration 2021)ऑनलाईन सुरू केले जाणार आहे. त्यासाठी 1 एप्रिलपासून फॉर्म उपलब्ध करून दिले जाणार आहेत. अमरनाथ यात्रेदरम्यान भाविकांच्या सुरक्षेसाठी विशेष सुरक्षा व्यवस्था देखील तैनात केली जाते. कश्मीरच्या खोर्‍यात भाविकांच्या सुरक्षेसाठी यंदा देखील सीआरपीएफ आणि आयटीबीपी जवानांना (CRPF/ITBP)नेमले जाणार आहे. भाविकांची सुरक्षा हे सरकारचं प्रथम प्राधान्य असल्याने ठिकठिकाणी कंट्रोल रूम्स बनवल्या जाणार आहेत. ज्याच्याद्वारा भाविकांच्या यात्रेच्या मार्गावर लक्ष ठेवणं सोपे होणार आहे.

कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नसल्याने भाविकांना अमरनाथ यात्रेमधे सहभागी होताना देखील काही विशेष कोविड 19 गाईडलाईन सांभाळणं आवश्यक असणार आहे. या यात्रेमध्ये श्रीनगर ते बालटाक पर्यंत हेलिकॉप्टर आणि काही मार्गांवर बॅटरी कार सुरू करण्यावर देखील विचार चालू असल्याचं मीडीया रिपोर्ट्समधून समोर आलं आहे.