Amarnath Yatra 2020: कोरोना व्हायरसचा वाढत प्रादुर्भाव पाहता यंदाची अमरनाथ यात्रा रद्द, सकाळ व संध्याकाळच्या आरतीचे थेट प्रक्षेपण मात्र सुरु
अमरनाथ यात्रेमध्ये हजारो हिंदू यात्रेकरू भाग घेतात (Photo Credit: Getty)

यावर्षीची अमरनाथ यात्रा (Amarnath Yatra) कोविड-19 च्या (COVID-19) प्रादुर्भावामुळे रद्द करण्यात आली आहे. यात्रेसंदर्भात निर्णय घेणाऱ्या श्री अमरनाथ श्राईन बोर्डने (SASB) मंगळवारी बैठक घेवून त्यावर अंतिम निर्णय घेण्याचे ठरवले. "परिस्थितीच्या आधारे श्री अमरनाथजी श्राईन बोर्डाने निर्णय घेतला की यावर्षीची श्री अमरनाथजी यात्रा आयोजित करणे उचित नाही आणि यात्रा 2020 रद्द करण्याची घोषणा केल्याबद्दल खंत व्यक्त केली," जम्मू-काश्मीर सरकारने (Jammu-Kashmir Government) सांगितले. या निर्णयामुळे अखेरीस वार्षिक तीर्थयात्रेच्या भोवतालचे अनुमान थांबले आहे. काही दिवसांपूर्वी, कोविड-19 च्या दृष्टीने यंदाची अमरनाथ यात्रा स्थगित करण्यासाठी केंद्र, जम्मू-काश्मीर प्रशासन आणि एसएएसबीला निर्देश मागविणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने रद्द केली होती. यंदा 21 जुलै ते 3 ऑगस्ट दरम्यान अमरनाथ यात्रेचे आयोजन केले जाईल असे म्हटले जात होते.

दरम्यान, यात्रा रद्द झाली असली तरी भाविकांसाठी सकाळ व संध्याकाळच्या आरतीचे थेट प्रक्षेपण उपलब्ध असेल. “धार्मिक भावना जिवंत ठेवण्यासाठी मंडळ सकाळ आणि संध्याकाळच्या आरतीचे थेट प्रक्षेपण/आभासी दर्शन चालू ठेवेल. पूर्वीच्या प्रथाप्रमाणे पारंपारिक विधी पार पाडले जातील. छडी मुबारक सरकारकडून सुलभ केले जाईल," राजभवनाने पुढे म्हटले.

गेल्या चार महिन्यांत कोरोना व्हायरसने जम्मू-कश्मीरच्या आरोग्य व्यवस्थेला मर्यादा घातली आणि कोविड-19 प्रकरणांमध्ये जुलैमध्ये तीव्र वाढ झाली असल्याचीही नोंद मंडळाने घेतली. या व्यतिरिक्त, आरोग्य कर्मचारी आणि सुरक्षा दलांनाही कोविड-19 ची लागण होत आहे आणि संपूर्ण वैद्यकीय, नागरी आणि पोलिस प्रशासनाचे सध्या लक्ष याक्षणी कोविड-19 चे स्थानिक प्रसारण रोखण्यावर आहे. दरवर्षी हजारोंच्या संख्येत भाविक अमरनाथ यंत्राला जातात. जून महिन्यात अमरनाथ श्राईन बोर्ड या यात्रेचे आयोजन करते, तर एप्रिल महिन्यात यात्रेसाठी नोंदणी प्रक्रिया सुरु होते. पण, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही नोंदणी प्रक्रिया सुरु होऊ शकली नाही. दुसरीकडे, मागील वर्षी सुरक्षेच्या कारणास्तव ही यात्रा रद्द करण्यात आली होती. अमरनाथ यात्रेसाठी दरवर्षी देशासह परदेशातूनही मोठ्या संख्येने भाविक येतात.