Air pollution: प्रदूषणामुळे देशाचे 2 लाख 60 हजार कोटींचे नुकसान; तब्बल 16 लाखाहून अधिक लोकांचा गेला जीव, अभ्यासामधून धक्कादायक खुलासा
File image of air pollution (Photo Credits: PTI)

ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज स्टडी 2019 (Global Burden of Disease Study 2019) मध्ये, आयसीएमआरने प्रदूषणाबद्दल (Air pollution) धक्कादायक खुलासे केले आहेत. अभ्यासानुसार, गेल्या वर्षी भारतात प्रदूषणामुळे 16 लाखाहून अधिक लोकांनी प्राण गमावले आहेत. एवढेच नव्हे तर प्रदूषणामुळे भारताला 2 लाख 60 हजार कोटींचे नुकसान झाले आहे. हे नुकसान भारताच्या जीडीपीच्या 1.36 टक्के इतके आहे. लॅन्सेट प्लॅनेटरी हेल्थ जर्नलमध्ये हा अभ्यास प्रकाशित झाला आहे. एम्स, आयसीएमआर आणि आयआयटी-दिल्लीच्या संशोधकांनी हा अभ्यास केला आहे.

मागच्या वर्षी प्रदूषणामुळे झालेले मृत्यू हे देशातील एकूण मृत्युच्या 17.8 टक्के होते. राजधानी दिल्लीबद्दल बोलायचे झाले तर प्रदूषणामुळे दिल्लीला सर्वात जास्त आर्थिक नुकसान झाले आहे. उत्तर प्रदेश, बिहार, राजस्तानसारख्या राज्यांमध्ये प्रदूषणामुळे सर्वात जास्त आर्थिक नुकसान झाले आहे. आकडेवारीनुसार दर तासाला 282 आणि दररोज 4, 383 लोक प्रदूषणामुळे आपला जीव गमावत आहेत. आयसीएमआरच्या अभ्यासानुसार गेल्या 29 वर्षांत घरातील वायू प्रदूषण (Household Air Pollution) 64% कमी झाले तर बाहेरील वायू प्रदूषणात 115% वाढ झाली आहे.

आकडेवारीनुसार, बहुतेक मृत्यूचे कारण म्हणजे PM 2.5 म्हणजेच, हवेतील धुळीचे कण आणि घरातील प्रदूषण हे आहे. या अभ्यासानुसार, प्रदूषणामुळे सन 2024 पर्यंत 5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याच्या भारताच्या स्वप्नाला धक्का बसू शकतो. प्रदूषणाचा परिणाम दिल्ली, हरियाणा, बिहार आणि उत्तर प्रदेश अशा 4 राज्यांत सर्वात जास्त दिसून आला आहे. 56 टक्के लोक अजूनही चुलीवर स्वयंपाक करतात ज्यामुळे प्रदूषणात वाढ होते. मात्र, गेल्या 29 वर्षांत त्यात लक्षणीय घट झाली आहे.

मागील वर्षी प्रदूषणामुळे 40 टक्के लोकांना फुफ्फुसांच्या आजाराने ग्रासले आहे, तर 60 टक्के लोकांना हृदयविकार, मधुमेह आणि स्ट्रोकच्या समस्यांचा सामना करावा लागला होता.