PM Modi| PC: Twitter/ ANI

भारतामध्ये आज (19 जुलै) पासून संसदेचं पावसाळी अधिवेशन (Parliament Monsoon Session) सुरू होत आहे. आज अधिवेशनाच्या कामाला सुरूवात करण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी मीडीयाशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी या अधिवेशनामध्ये कोविड 19 जागतिक महामारी (COVID-19 Pandemic) बाबत प्राधान्याने चर्चा करणार असल्याचं म्हटलं आहे. सार्‍या राजकीय पक्षांनी आक्रमकतेने विषय मांडावेत पण त्यावर सरकारला बोलण्यसही वेळ द्यावा म्हणजे लोकप्रतिनिधी आणि नागरिकांना देखील योग्य प्रकारे माहिती उपलब्ध होणार आहे.

दरम्यान यावेळी त्यांनी सार्‍या खासदारांना कोविड 19 प्रोटोकॉलचे पालन करण्याचं देखील आवाहन केले आहे. सध्या सारी मानवजात कोविड 19 जागतिक महामारीशी झुंजत आहे अशावेळेस आपण त्यावर साधकबाधक चर्चा करणं गरजेचे असल्याचंही बोलून दाखवलं आहे.

दरम्यान आज त्यांनी कोविड 19लसीकरणाबद्दलची देखील माहिती दिली आहे. 'बाहू' वर कोरोना लस टोचताच आपण 'बाहुबली' होत आहोत असं म्हणत 40 कोटी लोकांना लस देण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केले आहे. तर या लसीकरणाचा वेग वाढवण्यात आल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. लसीकरणामध्ये सार्‍या खासदार्‍यांनी किमान एक डोस घेतला असल्याने त्यांचं अभिनंदन केले आहे. नक्की वाचा: कोविड-19 च्या दुसऱ्या लाटेत लसीकरण झालेल्यांनाही Delta Variant चा संसर्ग- ICMR.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सार्‍या गटनेत्यांना उद्या (20 जुलै) संध्याकाळी वेळ काढून एकत्र भेटण्याचं आवाहन देखील केले आहे. या बैठकीमध्ये आपण कोरोना महामारी बद्दल सारी माहिती देणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. संसदेत चर्चा करण्यासोबतच संसदेबाहेरही त्यांनी गटनेत्यांशी बोलण्याचं आवाहन केले आहे.

भारतामध्ये मागील दुसर्‍या लाटेत नागरिकांचे अतोनात हाल झाले आहेत. त्यामुळे आगामी तिसर्‍या लाटेच्या पार्श्वभूमीवर आपण अधिक सावध राहणं गरजेचे असल्याने सरकारही विशेष खबरदारी बाळगत आहे.