आगरा-लखनौ एक्सप्रेस वे येथे ट्रक-बसचा भीषण अपघात, 14 जणांचा मृत्यू
Accident (Photo Credits-ANI)

उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद जिल्ह्यात एक भीषण अपघात झाल्याची घडली आहे. आगरा-लखनौ एक्सप्रेस वे येथे बसची ट्रकला जोरदार धडक लागल्याने यामध्ये 14 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर गाडीमधील बहुतांश जण गंभीर जखमी झाले आहेत. गंभीर जखमी झालेल्या रुग्णांना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. परंतु मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. सदर बस दिल्ली येथून बिहारकडे जाण्यासाठी निघाली होती. प्राप्त झालेल्या माहितीनुसार, ही दुर्घटना बुधवारी रात्री 10 वाजता फिरोजाबाद इटावा बॉर्डर जवळील लखनौ-आगरा एक्सप्रेस वे येथे झाली आहे.

खासगी बसने उभ्या असलेल्या ट्रकला मागील बाजूने येत जोरदार धडक दिली. ट्रक हा टायर पंक्चर झाल्याने रस्त्याच्या कडेला थांबला होता. बसमध्ये जवळजवळ 40-45 लोक असल्याचे सांगण्यात येत आहे. मृत झालेल्या नागरिकांमध्ये सर्वजण हे पुरुष आहेत.(राजस्थानमध्ये भीषण अपघात; 9 जणांचा मृत्यू तर, 15 जण जखमी) 

ANI Tweet:

मृतांमधील 11 जणांची ओळख पटली असून ही दुर्गघटना नेमकी कोणत्या कारणामुळे झाली हे स्पष्ट झालेले नाही. तर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी फिरोजाबाद दुर्घटनेप्रकरणी माहिती घेतली असून अधिकाऱ्यांना जखमी झालेल्यांना उत्तम उपचार देण्याचे आदेश दिले आहेत. तसेच मृतांचा परिवाराला 2 लाख रुपये आणि जखमी झालेल्यांना 50 हजारांची मदत करणार असल्याचे योगी आदित्यनाथ यांनी स्पष्ट केले आहे.