मुसळधार पावसामुळे बिहारमध्ये पूर; चक्क प्लास्टिक ड्रमच्या बोटीतून नवरा नवरीची पाठवणी (Video)
नावेतून नवरीची पाठवणी (Photo Credits: ANI)

देशभरात सध्या मुसळधार पाऊस चालू आहे. विशेषत: उत्तर भारतात तर पावसाचा हाहाकार माजला आहे. यामुळे आसाम, बिहार आणि उत्तर प्रदेशच्या बऱ्याच भागत पूरस्थिती निर्माण झाली आहे. संपूर्ण रस्ते जलमय झाल्याने गावांना तलावाचे रूप प्राप्त झाले आहे. या पावसामुळे लोकांचे जनजीवन इतके विस्कळीत झाले आहे की, लग्नानंतर नवरा नवरीची पाठवणी चक्क होडीतून करण्यात आली आहे. ही होडी देखील मजबून नसून प्लास्टिकच्या ड्रमपासून तयार केलेली आहे. सध्या या घटनेचा व्हिडीओ फार व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये दिसत आहे, की लग्नानंतर नवरा नवरी सावरून या छोट्याच्या होडीत बसतात. ही होडीदेखील ड्रमची तयार करण्यात आली आहे. त्यामुळे पावसाच्या जोरात ती कितपत तग धरून राहील याचा काही नेम नाही. त्यानंतर काही लोक त्या होडीला धक्का देत पुढे घेऊन जात आहेत. अशा प्रकारे या नवीन लग्न झालेल्या नवरा नवरीची एका नावेतून पाठवणी होते. (हेही वाचा: मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक नद्यांना पूर आल्याने ठप्प)

ही घटना बिहारच्या फारबिसगंज (Forbesganj) येथील आहे. पुरामुळे येथे परमान नदीचे पाणी रस्त्यावर उतरले आहे, ज्यामुळे संपूर्ण मार्ग जलमय झाले आहेत. पुरामुळे अनेक ठिकाणी घरे आणि रस्ते पूर्णतः मोडकळीस आले आहेत. अशात प्रशासनाकडून कोणत्याही सुविधा न मिळाल्याने लोकांनीच यातून बाहेर पडण्यासाठी जुगाड करायला सुरुवात केली, या जुगाडाचे ही नाव उत्तम उदाहरण आहे. मात्र दुसऱ्या बाजूला परिस्थितीचे गांभीर्यही ठसठसरित्या समोर येते.