Children Drowned In Son River: बिहार (Bihar) मधील रोहतास जिल्ह्यातील तुंबा गावातून एक हृदयद्रावक बातमी समोर आली आहे. येथे सोन नदीत (Son River) आंघोळ करताना 7 मुलं बुडाली. त्यापैकी पाच मुलांचा मृत्यू झाला असून दोन मुलांचा शोध सुरू आहे. नदीत बुडून मृत्यू झालेली सर्व मुले एकाच कुटुंबातील असल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातानंतर संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. रविवारी सकाळी कृष्णा गोंड यांची चार मुले आणि त्यांच्या बहिणीच्या मुलीसह सात जण आंघोळीसाठी सोन नदीवर गेले होते. आंघोळ करत असताना अचानक सर्व मुले खोल पाण्यात गेली आणि बुडू लागली. स्थानिक लोकांनी तातडीने घटनास्थळ गाठून पाच मुलांचे मृतदेह बाहेर काढले. मात्र दोन मुले अद्याप बेपत्ता आहेत.
प्रत्यक्षदर्शी गोलू कुमार यांनी सांगितले की, आम्ही सोन नदीत आंघोळीसाठी गेलो होतो. आंघोळ करत असताना एक मुलगा बुडू लागला. त्याला वाचवण्यासाठी आम्ही सर्वांनी पाण्यात उड्या मारल्या, पण आम्ही स्वतःही बुडू लागलो. कसेबसे आम्ही बचावलो आणि बाहेर आलो. पण पाच मुले बुडाली. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाचे पथक घटनास्थळी पोहोचले. (हेही वाचा - Four Children Drowned in Bhima River: धक्कादायक! भीमा नदीत पोहण्यास गेलेल्या एकाच कुटुंबातील 4 मुलांचा बुडून मृत्यू)
दरम्यान, रोहतास पोलीस ठाण्याचे प्रमुख म्हणाले की, या घटनेची माहिती मिळताच आम्ही तात्काळ पथकासह घटनास्थळी पोहोचलो आणि नदीत बुडालेल्या पाच मुलांचे मृतदेह बाहेर काढले. गोताखोर आणि एसडीआरएफची टीम दोन मुलांच्या शोधात व्यस्त आहे. सर्व मुलांचे वय 8 ते 12 वर्षे आहे. मुलांचे मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी सासाराम रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. (हेही वाचा - Children Died Due To Drowning In The River: मध्यप्रदेशमध्ये नदीत बुडून 3 मुलांचा मृत्यू, SDRF च्या पथकाने दोन मुलांचे मृतदेह बाहेर काढले; एकाचा शोध सुरू)
दोन मुलांचा शोध सुरू -
स्थानिक प्रशासनाने बचाव कार्याला गती देण्याचे आणि बेपत्ता मुलांचा शोध सुरू ठेवण्याचे आश्वासन दिले आहे. प्रशासनानेही कुटुंबाला सर्वतोपरी मदत करण्याचा प्रयत्न केला आहे. जिल्हा प्रशासनानेही या घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून पीडित कुटुंबांना आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. सोन नदीत यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत, मात्र यावेळी या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.