Coronavirus Update India: देशातील कोरोना व्हायरस रुग्णांचा रिकव्हरी रेट 62.93% वर; आतापर्यंत 6,53,751 जणांची कोरोनावर मात
Coronavirus | (Photo Credits: Pixabay)

COVID 19 Update In India: केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Health Ministry of India) दिलेल्या आजच्या अपडेट्सनुसार, देशात मागील 24 तासांत 34,884 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुगण आढळले असून 671 रुग्ण दगावले आहेत. देशात कोरोना बाधितांची एकूण संख्या 10,38,716 वर पोहोचली असून मृतांचा आकडा 26,273 वर पोहोचला आहे. तसेच सद्य घडीला 3,58,692 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. या सगळ्यात दिलासादायक वृत्त असे की आतापर्यंत एकूण 6,53,751 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून देशातील कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट 62.93 टक्के झाला आहे. काही दिवसांपूर्वी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन (Dr. Harshvardhan) यांनी सुद्धा याबाबत माहिती देत देशातील लोकसंख्या, मृत्युदर आणि कोरोना रुग्ण रिकव्हरी रेट पाहता परिस्थिती नियंत्रणात असल्याचे म्हंटले होते.

देशात कोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असणाऱ्या महाराष्ट्रात सुद्धा आता हळूहळू कोरोनाचा रिकव्हरी रेट सुद्धा वाढत आहे. राज्य सरकारच्या माहितीनुसार, महाराष्ट्रात कालच्या दिवसभरात कोरोनाचे 2 हजार 217 रुग्ण बरे होऊन घरी गेले. आतापर्यंत बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 1 लाख 60 हजार 357 झाली आहे. राज्यातील कोविड19चे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 54. 81 टक्के इतकं आहे. महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची जिल्हानिहाय आकडेवारी; तुमच्या जिल्ह्यात किती कोरोना रुग्ण आहेत जाणून घ्या

दरम्यान, ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीच्या (Oxford University) संशोधकांनी विकसित केलेली कोविड-19 (Covid-19) च्या लसीच्या चाचणीचे सुरुवातीच्या टप्प्यातील परिणाम सकारात्मक दिसून आले आहे. कोरोना विषाणू विरुद्ध ही लस उत्तम प्रतिसाद देत असल्याची अशी माहिती टेलिग्राफने (Telegraph) दिली आहे.