मायावतींचा BSP ठरला देशातील सर्वात श्रीमंत पक्ष; BJP पाचव्या स्थानावर, जाणून घ्या एकूण संपत्ती
मायावती (Photo Credits: PTI)

सध्या देशात सर्वात मोठ्या, लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. या पार्श्वभूमीवर तिकीट मिळालेल्या उमेदवारांना आणि पक्षांना आपल्या एकूण संपत्तीची माहिती निवडणूक आयोगाकडे द्यावी लागते. तर यामध्ये मायावतींचा ‘बहुजन समाज पार्टी’ (BSP) हा पक्ष भारतातील सर्वात श्रीमंत पक्ष ठरला आहे. या पक्षाच्या दिल्लीतील सरकारी बँकेच्या वेगवेगळ्या 8 खात्यांमध्ये 669 कोटी ठेव रक्कम आहे, तर 95.54 लाखाची कॅश आहे. दुसऱ्या नंबरवर अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाचा (SP) नंबर लागतो.

सपाकडे वेगवेगळ्या बँक खात्यांत 471 कोटी रुपये आहेत. मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगाणामध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या रोख डिपॉझिटमध्ये 11 कोटी रुपयांची घट झाली असल्याचे दिसून आले आहे. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर कॉंग्रेस पक्ष आहे. कॉंग्रेसकडे 196 कोटी रुपये आहेत. ही माहिती गेल्या वर्षी 2 नोव्हेंबर रोजी निवडणूक आयोगाला दिलेल्या माहितीच्या आधारे आहे. मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड विधानसभा निवडणुकांमध्ये प्राप्त झालेल्या विजयानंतर कॉंग्रेसने त्यांची एकूण संपत्ती जाहीर केली नाही. (हेही वाचा: राहुल गांधी यांच्या संपत्तीवर शंका; 2004 मध्ये 55 लाख, तर 2014 मध्ये 9 कोटी कशी? : रविशंकर प्रसाद)

नंतर तेलगू देसम पक्ष (TDP) चौथ्या स्थानावर आहे. टीडीपीकडे 107 कोटी रुपये आहेत. भाजप (BJP) या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. भाजपकडे 82 कोटी रुपये बँक बॅलेन्स आहे. भाजपने दावा केला आहे की त्यांनी 2017-18 मध्ये कमावलेल्या 1027 कोटी रुपयांपैकी 768 कोटी रुपये खर्च केले आहेत. ही खर्च केलेली रक्कम इतर पक्षांच्या तुलनेत अधिक आहे.