Andhra Pradesh: Avatar 2 चित्रपट पाहायला गेलेल्या व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
Heart Attack | (Photo credits: Pixabay)

Andhra Pradesh: गेल्या काही दिवसांपासून हृदयविकाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. तरुणही याला बळी पडत आहेत. अशीच एक घटना आंध्र प्रदेशातील (Andhra Pradesh) काकीनाडा जिल्ह्यातील पेद्दापुरम शहरातून समोर आली आहे. नुकताच प्रदर्शित झालेला 'अवतार 2' (Avatar 2) चित्रपट पाहताना हृदयविकाराच्या झटक्याने (Heart Attack) एका व्यक्तीचा मृत्यू झाला. लक्ष्मी रेड्डी असे मृताचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मी रेड्डी त्यांचा भाऊ राजूसोबत नुकताच प्रदर्शित झालेला अवतार-2 चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्ये गेले होते. चित्रपटाच्या मध्यभागी तो कोसळला. त्यानंतर लहान भाऊ राजूने त्यांना तात्काळ पेद्दापुरम येथील सरकारी रुग्णालयात नेले. जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. लक्ष्मी रेड्डी यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. (हेही वाचा - Avatar The Way of Water Twitter Review: प्रेक्षकांवर 'अवतार: द वे ऑफ वॉटर' चित्रपटाची जादू; नेटिझन्सनी केलं जेम्स कॅमेरॉनच्या दिग्दर्शनाचे कौतुक)

लक्ष्मी रेड्डी यांना उच्च रक्तदाबाचा त्रास होता. तपासणी करणाऱ्या डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, चित्रपट पाहून अतिउत्साहामुळे त्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आला, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला. सध्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

2010 मध्ये अवतार चित्रपटाचा पहिला भाग पाहिल्यानंतर तैवानमध्ये झाला होता एका व्यक्तीचा मृत्यू -

मीडिया रिपोर्ट्सनुसार, यापूर्वी तैवानमध्ये 2010 मध्ये आलेल्या 'अवतार' या चित्रपटाचा पहिला भाग पाहताना एका 42 वर्षीय व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. एजन्सी फ्रान्स प्रेसने 2010 मध्ये आपल्या अहवालातही हा दावा केला होता. (हेही वाचा - Youngest Victim of Cardiac Arrest in MP: मध्य प्रदेशात अवघ्या 12 वर्षीय मुलाचा कर्डिएक अरेस्टने मृत्यू)

हॉलिवूडचे दिग्गज दिग्दर्शक जेम्स कॅमेरॉन यांचा प्रसिद्ध चित्रपट 'अवतार द वे ऑफ वॉटर म्हणजेच 'अवतार 2' 16 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. गेल्या 12 वर्षांपासून प्रेक्षक या चित्रपटाच्या भाग-2 ची वाट पाहत होते. भारतात या चित्रपटाची चांगली कमाई होत आहे. रिलीज झाल्यापासून अनेक चित्रपटगृहांमध्ये हाऊसफुल्ल सुरू आहे.