R Dhruvanarayan Passed Away: कर्नाटक काँग्रेसचे कार्याध्यक्ष आर ध्रुवनारायण यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; 61 वर्षी घेतला अखेरचा निरोप
R Dhruvanarayan (PC - ANI/ Twitter)

R Dhruvanarayan Passed Away: कर्नाटक काँग्रेसचे कार्याध्यक्ष आर ध्रुवनारायण (R Dhruvanarayan) यांचे शनिवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 61 वर्षांचे होते. ध्रुवनारायण सकाळी म्हैसूर येथील त्यांच्या निवासस्थानी होते. याच दरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आला. डीआरएमएस हॉस्पिटलचे डॉ. मंजुनाथ यांनी याला दुजोरा दिला.

आर ध्रुवनारायण यांना सकाळी अचानक छातीत दुखू लागले. त्यानंतर त्यांच्या ड्रायव्हरने त्यांना डीआरएमएस रुग्णालयात नेले, मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. (हेही वाचा - Satish Kaushik Death: सतीश कौशिक मृत्यूप्रकरणाला नवे वळण; फार्म हाऊसवर सापडली आक्षेपार्ह औषधे)

आर ध्रुवनारायण यांच्या निधनाच्या वृत्तानंतर, रणदीप सुरजेवाला यांनी ट्विट केले की, 'नेहमी हसतमुख मित्र, आमचे नेते आणि काँग्रेसचे सर्वात समर्पित सैनिक, ध्रुवनारायण यांचे निधन हे काँग्रेससाठी कधीही भरून न येणारे नुकसान आहे. त्यांचे वर्णन कोणत्याही शब्दात करता येणार नाही. ध्रुवनारायण यांनी आपले जीवन गरिबांसाठी समर्पित केले. मित्रा आम्ही तुझी नेहमीच आठवण काढू. R.I.P.'

भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बिवी म्हणाले की, 'ध्रुवनारायण यांच्या निधनाच्या वृत्ताने मला धक्का बसला आहे आणि दु:ख झाले आहे. माजी खासदार आणि केपीसीसीचे कार्याध्यक्ष आर ध्रुवनारायण जी यांच्यासारख्या नेत्याच्या निधनाने मोठा धक्का बसला. त्याच्या आत्म्याला शांती लाभो.'

त्याचवेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे संयुक्त सचिव कृष्णा अल्लावरू यांनी ट्विट केले की, माजी खासदार आणि केपीसीसीचे कार्याध्यक्ष आर. ध्रुवनारायण जी यांच्या निधनाची बातमी ऐकून दु:ख झाले. त्यांचे कुटुंबीय, मित्र आणि हितचिंतकांना माझ्या संवेदना.