New Traffic Rules in India 2019: वाहनधारकांनो सावधान! तुम्ही स्वत: किंवा आपल्या चालकाकरवी अथवा कोणा इतर व्यक्तीकरवी आपले वाहन रस्त्यावर आणत असाल तर काळजी घ्या. आजपासून (1 सप्टेंबर 2019) देशभरात वाहतुकीचे नवे नियम (New Traffic Rules) लागू होत आहेत. केंद्र सरकारने नव्या मोटार वाहतूक कायद्यातील ६३ तरतुदी लागू करण्यासंदर्भात एक अधिसूचना काढली आहे. त्यानुसार देशात वाहतुक कायदा राबवला जाणार आहे. या नव्या नियमांनुसार आकारण्यात येणाऱ्या दंडाची रक्कम आणि शिक्षेचा कालावधी बराच मोठा आहे. तसेच, या नियमांची वाहतूक पोलीस (Traffic Police) कठोर अंमलबजावनीही करणार आहेत. त्यामुळे वाहतूक कायदा (Motor Vehicles Act) अथवा वाहतूक नियम (Traffic Rules) भंग होईल असे वर्तन करु नका. अर्थसंकल्पीय अधिवेशनात संसदेच्या राज्यसभा आणि लोकसभा अशा अनुक्रमे वरिष्ठ आणि कनिष्ठ सभागृहात मोटार वाहतूक दुरुस्ती विधेयक संमत करण्यात आले होते. जाणून घ्या वाहतुकीचे नवे नियम दंड आणि शिक्षेचा कालावधी.
वाहनधारकांनी जर आपल्या अल्पवयीन मुला-मुलींच्या हाता वाहन दिले आणि त्यांच्याकडून गुन्हा घडला तर त्यास पालकांना दोषी धरण्यात येईल. तसेच या गुन्ह्यापोटी तब्बल 25 हजार रुपये आर्थिक दंड तर, 3 वर्षे तुरुंगवास अशा शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. विनापरवाना वाहन चालवत वाहतूक नियम भंग केल्यास आता 5 हजार रुपये इतका दंड आकारला जाणार आहे. वेगमर्यादेचा भंग करत वाहन भरधाव वेगाने हाकल्यास 2 हजार रुपये, रस्त्यावरुन जाताना रुग्णवाहिकेला वाट रिकामी न करुन दिल्यास तब्बल 10 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे. दुचाकी वाहन चालवताना जर तीघांनी प्रवास (ट्रिपल सीट) केल्यास दंडाची रक्कम 2000 इतकी असणार आहे. (हेही वाचा, सावधान! वाहतुकीचे नियम मोडल्यास चालकाचा परवाना तीन महिन्यांसाठी रद्द)
जाणून घ्या कोणत्या कोणत्या गुन्ह्यास किती दंड आणि शिक्षा
रस्तेवाहतूक नियम दंड आणि शिक्षा | |||
नियम | दंडाची जुनी रक्कम | नव्या दंडानुसार रक्कम | नियमभंग केल्यास शिक्षा |
रस्ते नियमांचा भंग | 100 रुपये | 500 रुपये | -- |
प्रशासनाचा आदेशभंग | 500 रुपये | 2,000 रुपये | -- |
परवाना नसलेले वाहन चालवणे | 500 रुपये | 5,000 रुपये | -- |
पात्र नसताना वाहन चालवणे- | 500 रुपये | 10,000 रुपये | -- |
वेगमर्यादा तोडणे | 400 रुपये | 2,000 रुपये | -- |
धोकादायक वाहन चालवणे | 1,000 रुपये | 5,000 रुपये | -- |
दारू पिऊन वाहन चालवणे | 2,000 रुपये | 10,000 रुपये | -- |
वाहन वेगाने चालवणे | 500 रुपये | 5,000 रुपये | -- |
विनापरवाना वाहन चालवणे | 5,000 रुपये | 10,000 रुपये | -- |
सीटबेल्ट नसणे | 1000 रुपये | 1,000 रुपये | -- |
दुचाकीवर दोनपेक्षा जास्त व्यक्ती | 1000 रुपये | 2,000 रुपये | -- |
रुग्णवाहीका आणि इतर महत्त्वाच्या वाहनांना रस्ता न देणे | --- | 10,000 रुपये | -- |
विमा नसताना वाहन चालवणे | 1,000 रुपये | 2,000 रुपये | -- |
अल्पवयीन मुला-मुलींकडून गुन्हा (पालक दोषी) | -- | 25,000 | 3 वर्षे तुरुंगवास |
गेल्या काही वर्षात रस्ते अपघातात होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण प्रचंड वाढले होते. हा आकडा प्रतिवर्ष तब्बल दीड लाखाच्या घरात असल्याचे अधिकृतपणे सांगितले जाते. केंद्रिय रस्तेवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनीही अनेकदा याबाबत चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे नितीन गडकरी यांच्या रस्ते वाहतूक विभागानेच जुन्या मोटारवाहन कायद्यात दुरुस्ती करणारे विधेयक 16 व्या लोकसभेत मांडले होते. त्याला १७व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनात मंजुरी मिळाली. अत्यंत निष्काळजी आणि बेदरकारपणे वाहन हाकत स्वत:च्या आणि इतरांच्या मृत्यूचे कारण ठरु पाहणाऱ्यांना चाप लावण्यासाठी वाहतूक नियमात बदल करण्यात आले आहेत.