Aarey Protest: Delhi Metro प्रकल्पात 'अशी' वाचवली होती १२ हजारहून अधिक झाडे
Delhi Metro (Photo Credits: Twitter)

मुंबईतील मेट्रो (Mumbai Metro) कारशेडसाठी आरेतील (Aarey Forest) वृक्षतोडीला सुप्रीम कोर्टाच्या विशेष पीठाने सोमवारी तात्पुरती स्थगिती दिली खरी. परंतु टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार सुप्रीम कोर्टाच्या आदेशापूर्वीच 2141 झाडे तोडण्यात आली होती.

अनेक पर्यावरण प्रेमींनी यासाठी आंदोलनं केली, काहीजणांवर कारवाई देखील झाली. पण अशीच परिस्थिती दिल्ली मेट्रो (Delhi Metro) प्रकल्पाचे काम सुरु असताना देखील उद्भवली होती.

तब्बल 337 कि. मी. लांबीचे दिल्ली मेट्रोचे नेटवर्क आहे. दिल्ली मेट्रोच्या फेज 1 च्या निर्मितीसाठी दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनला (डीएमआरसी) 56,307 झाडं तोडण्याची परवानगी मिळाली होती. परंतु डीएमआरसी नाईलाज म्हणून 43,727 झाडे तोडली परंतु मोठ्या हुशारीने 12,580 झाडं वाचवली गेली.

मेट्रोच्या एका प्रवक्त्याने टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, "प्रत्येक प्रकल्पासाठी पर्यावरण प्रभावाचे आकलन करणे जरुरीचे आहेच. जेव्हा आम्ही विस्तृत योजना अहवालानुसार काम सुरू करतो तेव्हा आम्ही जमिनीवर काही तडजोडी करू शकतो. ट्रॅकमध्ये थोडं संशोधन करून एक जरी झाड वाचवता आलं तरी आम्ही पूर्ण प्रयत्न करतो. पण जिथे शक्य नाही, तिथे मात्र झाडं तोडावीच लागतात."

इतकंच नव्हे तर डीएमआरसीने नमूद केल्यानुसार त्यांनी ट्री ट्रान्सप्लान्टेशनचे ही कार्य राबवले. डीएमआरसीचे प्रवक्ता अनुज दयाल टीओआईला म्हणाले, "एका झाडाला 5 कि.मी. च्या अंतरातच ट्रान्सप्लान्ट केले जाऊ शकते. तसे केले तरच त्याची जगण्याची शक्यता असते. मात्र सर्वसाधारणपणे ट्रान्सप्लान्ट केलेल्या झाडांचं जगण्याचं प्रमाण फारच कमी असतं."